अर्धापुरात नात्याला काळीमा फासणारी घटना; भावानेच केला बहिणीवर अत्याचार, नराधम भावास कोठडी

लक्ष्मीकांत मुळे
Tuesday, 26 January 2021

तालुक्यात सख्या भावाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून भावाविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : भाऊ- बहिणीचे पवित्र नाते समजले जाते. या पवित्र नात्यालाच काळीमा फासणारी घटना घडल्याने विश्वास तरी कोणावर ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात सख्या भावाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून भावाविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या घटनेबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात आई वडील काही कामानिमित्ताने बाहेर गेले होते. यावेळी भावाने आपल्या सख्या बहिणीवर अत्याचार केला. ही घटना जुन 2020 ते ता. 27 नोव्हेंबर 2020 या काळात तीन ते चार वेळा हा घृणास्पद प्रकार घडला होता. तसेच ही घटना आई- वडिलांना सांगितलीस तर जीवे मारण्याची धमकी दिली.

सदरील मुलीचे लग्न न झाल्याने आपली समाजात बेआब्रु होईल म्हणून सदरील घटना कोणालाही सांगितली नाही. दरम्यान सदरील पिडीत मुलीचे लग्न 27 नोव्हेंबर २०२० ला हिंगोली जिल्ह्यातील तरुणाशी झाले. त्यानंतर सदरील घटना पिडीत मुलीने आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर पती- पत्नीने अर्धापूर पोलिस ठाणे सोमवारी (ता. 25) गाठले. पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी भावाविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सदरील आरोपी भावास पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजार केले. यावेळी न्यायालयाने त्याला गुरुवार (ता. 28) जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार बळीराम राठोड करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sister tortures sister in Naradham incident, accused brother in custody nanded crime news