नांदेड महापालिकेच्या क्रीडा आस्थापनेला सव्वा कोटींचा फटका

प्रा. इम्तियाज खान
Tuesday, 6 October 2020

मार्च महिन्यापासून जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. यामुळे नांदेड वाघाळा महापालिकेच्या जलतरणिका, जिम व बॅडमिंटन हॉल आदी बंद करण्यात आले. त्यामुळे महापालिका प्रशासनास सव्वा ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेच्या श्री गुरू गोविंदसिंघजी स्टेडियम परिसरात विविध क्रीडा आस्थापना आहेत. या आस्थापनेतून महापालिकेला दरवर्षी एक ते दीड कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. परंतू गेल्या मार्चपासून देशभरात कोरोना संसर्ग आणि लॉकडाउनमुळे तसेच अनलॉकच्या निर्णयामुळे या आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनास सव्वा ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम परिसरात महापालिकेतर्फे १९७० च्या दशकात स्टेडियम, बॅडमिंटन हॉल, जिम व जलतरणिका अशा क्रीडा विषयक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. या सर्व पायाभूत क्रीडा सुविधा व्यावसायिक तत्वावर उपयोगात आणल्या जातात. त्यामुळे महापालिकेला या आस्थापनांकडून कोट्यवधी रुपयांचे महसूल प्राप्त जातो. एकेकाळी जेव्हा जकात व्यवस्था सुरु होती तेंव्हा जकातीनंतर सर्वात जास्त उत्पन्न देणारा स्तोत्र हा शांताराम सांगणे जलतरणिकेचा असायचा. उन्हाळ्यात तर उत्पन्न सर्वात जास्त प्राप्त होत होते. स्टेडियमचे मैदान क्रीडा स्पर्धा बरोबरच, राजकीय सभा, संगीत रजनी, आर्केस्ट्रा, महानाट्य व इतर कार्यक्रमांसाठी देऊन उत्पन्न मिळवले जात होते. बॅडमिंटन हॉल व जिम हे देखील महापालिकेची महत्वाची उत्पन्नाची साधने होती. 

हेही वाचा - नांदेडला चोवीस तासानंतर सापडला डॉ. भगवान जाधव यांचा मृतदेह 

कोरोना संसर्गामुळे क्रीडा बंद
मार्च महिन्यापासून जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. यामुळे जलतरणिका, जिम व बॅडमिंटन हॉल आदी बंद करण्यात आले. तसेच दरवर्षी २५ ते ३० लाख रुपये उत्पन्न देणारी जलतरणिका ता. एक एप्रिल २०१७ पासून आधुनिकीकरण करण्यासाठी पूर्णपणे बंद आहे. तर दुसरीकडे जवळपास दीड कोटी रुपये आधुनिकीकरणासाठी खर्च करण्यात आले आहेत. क्रिकेट मैदानावर वेगवेगळ्या क्रीडा मंडळातर्फे अखिल भारतीय पातळीच्या क्रिकेट स्पर्धेसाठी वर्षभर मैदान शुल्क आकारून देण्यात येत असे. बॅडमिंटन हॉलमध्ये हौशी सराव करणारे व प्रशिक्षण शिबीरांचे ही उत्पन्न मिळत असे. जिम मध्ये ही शंभर एक व्यायामपटू सकाळ संध्याकाळ तासिका तत्वावर लाभ घेत असत त्याचेही उत्पन्न मिळत असे. क्रीडा आस्थापनेबरोबरच याच परिसरातील शंकरराव चव्हाण नाट्यगृह आणि गुजरी माताजी विसावा उद्यान हे देखील उत्पन्नाचे साधन होते. मात्र, लॉकडाउनमुळे महापालिकेच्या ह्या उत्पन्नांच्या साधनांवर टाळेबंदीमुळे कोट्यावधी रूपयांच्या उत्पन्नावर पाणी फिरले आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - पाण्याचा अंदाज न आल्याने पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा मृत्यु 

क्रीडापटू निर्णयाच्या प्रतिक्षेत
या सर्व सुविधा आता शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत. शालेय बॅडमिंटन खेळाडू, हौशी सरावपटू, देशभरातील क्रिकेट संघ, जलतरणपटू व इतर मंडळीना लवकरच या सुविधांचा पुन्हा उपयोग कधी करता येईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे आधुनिकरण झालेल्या शांताराम सांगणे जलतरणिकेत सूर मारण्यासाठी व जलविहार करण्याची संधी कधी मिळेल? या साठी अनेकजण उत्सुक आहेत. 

(संपादन - अभय कुळकजाईकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sports establishment of Nanded Municipal Corporation hit Rs, Nanded news