esakal | नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या घटली; मात्र मृत्यू दरात घट होईना

बोलून बातमी शोधा

कोरोना
नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या घटली; मात्र मृत्यू दरात घट होईना
sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्येत कमालीची घट होताना दिसत आहे. मात्र त्या मानाने मृत्यूसंख्येत घट होताना दिसत नाही. गुरुवारी (ता. २९) प्राप्त झालेल्या तीन हजार ३२० अहवालापैकी दोन हजार ३८७ निगेटिव्ह, १६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसाला एक टक्याने कमी होत असली तरी, मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

गुरुवारी (ता. २९) एक हजार २९३ कोरोना बाधित रुग्णांनी आजारावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ६६ हजार ३६० कोरोना बाधित रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. गुरुवारी विष्णुपूरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्यापैकी सात पुरुष, दोन महिलांचा, श्रीगुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयातील चार महिला, चार पुरुषांचा, देगलूर कोविड सेंटरमधील दोन पुरुष, एक महिलेचा, किनवट कोविड सेंटरमधील दोन महिलांचा तर आधार या खासगी कोविड सेंटर व मेडिकेअर आणि क्रिटिकल कोविड सेंटर लोहा येथील एक पुरुष व एका महिलेचा अशा २४ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्हाभरातील एक हजार ५३१ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - त्यामुळे 'रेमडेसिविर'साठी हट्ट धरू नका

गुरुवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात- ३२०, नांदेड ग्रामीण- २८, बिलोली- ३९, हिमायतनगर- १४, उमरी- ४१, माहूर- सहा, कंधार- ३९, देगलूर- ४०, मुदखेड- ३१, मुखेड- २३, अर्धापूर- ११, धर्माबाद- ६३, किनवट- १९, नायगाव- ३५, भोकर- १६, लोहा- २९, हदगाव- १९, बोधन (तेलंगणा)- दोन, हिंगोली- १७, परभणी- नऊ, औरंगाबाद- एक, यवतमाळ- सहा, लातूर- पाच, सोलापूर- एक, पुणे- एक, अमरावती- एक असे ८१६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ७९ हजार ५१७ इतकी झाली असून, त्यापैकी ६६ हजार ३०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या ११ हजार ४१६ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत त्यापैकी १८७ बाधितांची प्रकृती गंभीर आहे.

कोरोना मीटर

एकुण पॉझिटिव्ह- ७९ हजार ५१७

एकुण कोरोनामुक्त- ६६ हजार ३०७

एकुण मृत्यू- एक हजार ५३१

गुरुवारी पॉझिटिव्ह -८१६

गुरुवारी कोरोनामुक्त - एक हजार २९३

गुरुवारी मृत्यू- २४

उपचार सुरु- ११ हजार ४१६

गंभीर रुग्ण -१८७

संपादन- प्रल्हाद कांबळे