नांदेडला तालुकास्तरावर कोविड केंद्र अद्ययावत करा - खासदार चिखलीकर

अभय कुळकजाईकर
Tuesday, 8 September 2020

नांदेडला सर्वच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना सीड मास्क, ग्लोज, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. जनतेनी कोरोनाला न घाबरता धैर्याने तोंड द्यावे, काळजी घ्यावी, विनाकारण गर्दी करु नये, खासगी रुग्णालयासाठी भाजपाने हेल्पलाईन जारी केली आहे. त्यावर संपर्क साधावा, असेही आवाहन खासदार चिखलीकर यांनी केले आहे.

नांदेड - जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत आहे. खाजगी रुग्णालय व सरकारी दवाखान्यात खाटांची कमतरता पडत आहे. वेळेवर उपचार होत. नसल्यामुळे काही रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. आरोग्य व्यवस्थेकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे कोरोनासंसर्ग झालेले रुग्ण व नातेवाईक यांचे उपचारासाठी बेड उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी जिल्ह्रयाचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्याकडे केली आहे.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात नऊ हजारहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. ता. सात सप्टेंबरपर्यंत मृतांची संख्या २७२ इतकी आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग, डॉक्टर, परिचारीका त्यांचे सहकारी गेल्या पाच महिन्यापासून रुग्ण सेवेत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक यांची यंत्रणा कोरोना लढाईत रस्त्यावर आहे. भाजपासह विविध राजकीय, सामाजिक संस्थांनी लोकांना सहकार्य केले पण सद्या परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसते आहे. 

हेही वाचा - नांदेडला मंगळवारी ३३२ पॉझिटिव्ह; बरे होण्याचे प्रमाण वाढले
 

तालुकानिहाय आरोग्य यंत्रणा सुविधा द्या
खासगी रुग्णालयातही कोरोनावर उपचार केले जात आहेत. परंतु रुग्णांची वाढती संख्या पाहता आता बेड उपलब्ध होत नाही. वेळेवर उपचार मिळेनासा झाला. त्यामुळे रुग्ण दगावत आहेत. अनेक तक्रारी नागरिक करीत आहेत. राज्य सरकारने तातडीने आरोग्य कर्मचारी वाढवावेत. तालुका पातळीवर कोविड उपचार केंद्र अद्यावत करावेत. व्हेटिलेटर आहेत. ऑक्सीजन आहे. पण कर्मचा-यांअभावी ते बंद आहे तर दुसरीकडे बेड नाहीत म्हणून रुग्ण दगावत आहेत, असे परपस्पर विरोधभास जनतेसाठी संतापजनक आहे. तेंव्हा तातडीने तालुकानिहाय आरोग्य यंत्रणा सुविधा उपलब्ध कराव्यात.

हेही वाचलेच पाहिजे - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वपक्षीयांची बैठक बोलविणार, परभणीचे खासदार देणार लढा 

प्रतिबंधात्मक उपाययोजना करा
शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी यांना तातडीने कोरोना उपचारासाठी ॲडव्हान्स रक्कम द्यावी जेणे करुन पैसाअभावी हे रुग्णांची हेळसांड होणार नाही. कर्तव्यावर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचा-यांना ५० लाख रुपयांच्या विम्याचा लाभ तत्काळ द्यावा, अनुकंपाअंतर्गत कुटुंबातील सदस्यांना नोकरीवर घ्यावे. सर्वच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना सीड मास्क, ग्लोज, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. जनतेनी कोरोनाला न घाबरता धैर्याने तोंड द्यावे, काळजी घ्यावी, विनाकारण गर्दी करु नये, खासगी रुग्णालयासाठी भाजपाने हेल्पलाईन जारी केली आहे. त्यावर संपर्क साधावा, असेही आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Update Kovid Kendra at Nanded taluka level - MP Chikhlikar, Nanded news