वाडी स्वतंत्र नगरपंचायतीसाठी नगरविकासमंत्री, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट- बालाजी कल्याणकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपले म्हणणे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आमदार बालाजी कल्याणकर, नांदेड उत्तर
आमदार बालाजी कल्याणकर, नांदेड उत्तर

नांदेड ः नांदेड वाघाळा महापालिकेच्या बुधवारी (ता. २३) झालेल्या सर्वसाधारण सभेच्या पुरवणी पत्रिकेतील विषय क्रमांक तीन हद्दवाढीचा प्रस्तावास नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी विरोध दर्शविला आहे. यापूर्वी नांदेड वाघाळा महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सांगवी, जंगमवाडी, वसरणी, रहिमपुर, वाघाळा, असदवन, असर्जन, कवठा त्याबरोबरच अलीकडेच तरोडा बुद्रुक व तरोडा खुर्द तसेच ब्रह्मपुरी या गावांचा समावेश केला आहे. त्यांचा मूलभूत विकास झाला नाही, तर पावडेवाडी गावाचा समावेश कशासाठी? असा प्रश्न आमदार बालाजी कल्याणकर यांनी केला आहे. त्याऐवजी वाडीची स्वतंत्र नगरपंचायत बनवा, असेही त्यांनी सुचविले आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपले म्हणणे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नांदेड वाघाळा महापालिकेला यापूर्वीच जंगमवाडी, वसरणी, रहिमपूर, वाघाळा, असदवन, फतेजंगपुर, कवठा या गावांचा समावेश केला होता. त्यानंतर २००९ मध्ये तरोडा खुर्द, तरोडा बुद्रुक, सांगवी, ब्रह्मपुरी या गावांचा समावेश करण्यात आला. नव्याने समावेश केलेल्या भागात ड्रेनेज लाईन, पाण्याची पाईपलाईन तसेच रस्ते, नाल्या अशा मूलभूत सुविधांचा अभाव असून सिडको- हडको भागात घरकुल योजना सुद्धा प्रशासनाला राबविता आलेली नाही. संबंधित गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून अद्यापपर्यंत मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

हेही वाचा - वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यामागे शास्त्र जरी असलं तरीदेखील त्याला आणखी एक कारणसुद्धा आहे.

विकास करणे शक्य आहे का?

नांदेड वाघाळा महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता व भविष्यात हद्द वाढीत येणाऱ्या भागाचा विकास करणे शक्य नाही. डिसेंबर २०२० च्या सर्वसाधारण सभेच्या पुरवणी विषय पत्रिकेतील विषय क्रमांक तीन मधील हद्दवाढीच्या प्रस्तावात शहरालगतची कोणती गावे घेणार? याचा सुद्धा उल्लेख केला नाही. यापूर्वीच महापालिकेच्या कार्यक्षेत्रात घेतलेल्या गावांचा मूलभूत विकास झाला नाही. आता नव्याने पावडेवाडी गावाचा समावेश कशासाठी महापालिका आपल्या क्षेत्रात करत आहे, असा प्रश्नही आमदार तथा शिवसेनेचे नगरसेवक कल्याणकर यांनी केला आहे.

वाडी स्वतंत्र नगरपंचायत तयार करा

पावडेवाडी गावाची स्वतंत्र नगरपंचायत तयार करण्यासाठी व या गावाचा समावेश महानगरपालिकेत करू नये यासाठी आ. बालाजी कल्याणकर हे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अशोकराव चव्हाण भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

येथे क्लिक करा - AIIMS प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे

शब्द फिरवणारा मी नव्हे...

महापालिकेच्या कोणत्याही नेत्यांशी अथवा पदाधिकाऱ्यांशी पावडेवाडीसह इतर गावांचा महापालिकेत समावेश करण्याबाबत माझी बैठक अथवा चर्चा झाली नाही. तसेच जनतेला माहिती आहे की मी शब्द जपणारा माणूस आहे. शब्द फिरवणारा मी नाही. त्यामुळे याबाबत मला कोणी शिकवू नये, असेही आमदार कल्याणकर यांनी स्पष्ट केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com