esakal | नांदेड जिल्ह्यात चार लाख १७ हजार जणांचे लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण

नांदेड जिल्ह्यात चार लाख १७ हजार जणांचे लसीकरण

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड ः कोरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्यात सोमवारपर्यंत (ता. २४ मे) एकुण चार लाख १७ हजार ३६६ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. मंगळवारपर्यंत (ता. २५ मे) एकुण चार लाख ५५ हजार ३० कोविड लसीचा साठा प्राप्त झाला आहे. त्यामध्ये कोविशिल्डचे तीन लाख ४९ हजार ५३० डोस तर कोव्हॅक्सीनचे एक लाख साडेपाच हजार डोसचा समावेश आहे. हे सर्व डोस ४५ वर्षावरील व्यक्तींसाठीच दुसऱ्या लसीकरणाला देण्यात आले आहेत.

दरम्यान, नांदेड जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील ९१ लसीकरण केंद्रांवर कोविडचे लसीकरण व्हावे या दृष्टीने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली आहे. बुधवारी (ता. २६) नांदेड महापालिका क्षेत्रात मोडणाऱ्या आठ केंद्रावर कोविशील्ड या लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा व सिडको या आठ केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी शंभर डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

हेही वाचा - हा प्रवासी संपूर्ण विमानात एकटाच बसला होता.

शहरी भागात मोडणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बारड, बिलोली, भोकर या १६ केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय शंभर डोस उपलब्ध करुन दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी शंभर डोस उपलब्ध केले आहेत.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या १२ ते १६ आठवडे म्हणजेच सुमारे ८४ दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. एखाद्या केंद्रांवर ४५ वर्षावरील लाभार्थी नसेल तर तो डोस प्रथम लसीकरणासाठी वापरता येईल. कोव्हॅक्सीन ही लस ४५ वर्षावरील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. महापालिका कार्यक्षेत्रातील ४५ वर्षावरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोससाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. वय १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे