Video - अशोक चव्हाण यांचा रुग्णालयातून ‘स्पीक अप इंडिया’ मोहिमेत सहभाग

अभय कुळकजाईकर
Thursday, 28 May 2020

कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी - वढेरा यांनी कोट्यावधी जनतेच्या हक्कासाठी ‘स्पीक अप इंडिया’ ही मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही सहभाग घेऊन पाठिंबा दिला आहे.

नांदेड - राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण कोरोनामुळे मुंबईच्या रुग्णालयात दाखल असताना देखील त्यांनी आपले कार्य सुरुच ठेवले आहे. गुरुवारी (ता. २८) कॉँग्रेस पक्षाने राबविलेल्या ‘स्पीक अप इंडिया’ मोहिमेत त्यांनी सहभाग नोंदवून आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली. त्यांचा रुग्णालयातील हा व्हिडिओ गुरुवारी दुपारी व्हायरल झाला आहे.

           

नांदेडला पालकमंत्री श्री. चव्हाण यांना रविवारी (ता. २४) कोरोनाची बाधा झाल्यानंतर ते सोमवारी (ता. २५) कार्डियाक अम्ब्युलन्सने मुंबईला रवाना झाले. त्या ठिकाणी त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनासोबतचा त्यांचा लढा सुरु असताना त्याचबरोबर बोलताना थोडा श्‍वास लागत असताना देखील त्यांनी ‘स्पीक अप इंडिया’ या मोहिमेत सहभाग घेतला. त्यांनी याबाबतचा एक व्हिडिओही व्हायरल केला असून देशातील कोट्यावधी जनतेचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी कॉँग्रेसतर्फे राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत सहभाग नोंदवला. 

हेही वाचा - अशोक चव्हाण मुंबईत दाखल, प्रकृती ठणठणीत...

सहभागी होऊन दिला पाठिंबा
कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी - वढेरा यांनी कोट्यावधी जनतेच्या हक्कासाठी ‘स्पीक अप इंडिया’ ही मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही सहभाग घेऊन पाठिंबा दिला आहे. देशवासियांचे जे मनोगत आहे. त्यांचा आवाज बुलंद करण्याच्या दृष्टीकोनातून मी देखील मुंबईच्या एका हॉस्पीटलमधून कोरोनाशी लढा देत असताना पाठिंबा देत असून या मोहिमेमध्ये सहभागी होत असल्याचे श्री. चव्हाण यांनी व्हिडिओद्वारे म्हटले आहे. 

काय म्हणाले अशोक चव्हाण..
पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, मला केंद्र सरकारला जाणीव करुन द्यायची आणि विनंती करायची आहे. कोरोना महामारीचा मुकाबला करत असताना सर्वात जास्त फटका जर कुणाला बसला असेल तर सर्वसामान्य, शेतकरी, शेतमजूर, गरीबातील गरीबाला, छोटे तसेच मध्यम उद्योगांना फटका जास्त बसला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कॉँग्रेसच्या नेत्यांना काही सूचना केल्या आहेत. मी पण सहभाग नोंदवून मागण्यांना पाठिंबा देत आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील यांचा राजकीय सेवानिवृत्तीचा निर्णय !

जनतेच्या हितासाठी केलेली मागणी महत्वाची
मुख्यमंत्रीपदासह केंद्रात आणि राज्यात विविध पदांवर काम केलेल्या अशोक चव्हाण यांनी कोरोनाग्रस्त असताना देखील रुग्णालयात राहून त्यांनी जनतेच्या हितासाठी केलेली मागणी महत्वाची आहे. स्वतः कोरोनाग्रस्त राहूनही त्यांनी जनतेसाठी केलेली मागणी महत्वाची आहे. भारतातील जनतेसाठी कॉँग्रेस पक्षाने ज्या मागण्या केल्या आहेत त्या केंद्र सरकारने पूर्ण कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. स्वतः कठीण परिस्थितीत असताना देखील श्री. चव्हाण यांनी जनतेच्या हितासाठी मागणी केल्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ कॉँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील व्हायरल करत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video - Ashok Chavan's participation in 'Speak Up India' campaign from the hospital, Nanded news