Video - शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाच्या मागणीसाठी भाजपचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पिक कर्जाचे वाटप करावे या व इतर मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी (ता. २२ जून) नांदेड शहरात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसमोर तसेच जिल्हाभरातही तालुक्याच्या ठिकाणी बॅंकासमोर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. 

नांदेड - पावसाळा सुरु झाला तरी अद्यापपर्यंत शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप झाले नाही. कर्ज वाटप न झाल्यामुळे पेरणी कशी करावी या चिंतेत शेतकरी सापडला असून शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी कर्जाचे वाटप तातडीने करावे अशी मागणी करत सोमवारी (ता. २२ जून) भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नांदेड शहर आणि जिल्ह्यात आंदोलन केले.

भारतीय जनता पक्षाचे महानगराक्ष प्रविण साले यांनी याबाबत एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी निवेदन देऊन मागणी केली आहे. भाजपाच्यावतीने सोमवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यातही अर्धापूर, मुदखेड, धर्माबाद, देगलूर, कंधार, लोहा, नायगाव, हदगाव, किनवट आदी तालुक्याच्या ठिकाणीही आंदोलन करण्यात आले. 

हेही वाचा - Video - गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविणे आहे शक्य, कसे? ते वाचाच

शेतकरी अर्थिक अडचणीत
कोरोनाच्या संकटाबरोबरच शेतकरी राज्य सरकार शेतकर्‍यांसाठी कुठलाच ठोस उपाययोजना राबवित नसल्याने संकटात सापडला आहे. राज्य सरकारच्या बांधावर खत आणि बियाणे योजनेचा बोजवारा उडाला आहे. कापसाची खरेदी न झाल्याने कापूस घरामध्ये पडून असून नाईलाजास्तव कमी भावात कापुस विकावा लागत आहे. कापुस, चणा, तुरीचे पैसे आलेले नाहीत त्यामुळे शेतकरी अर्थिक अडचणीत सापडला असून सावकारांकडे दागिणे गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. 

घोषणेचा सरकारला पडला विसर 
फेब्रुवारी महिन्यात भाजपाने आंदोलन केल्यानंतर शेतकर्‍यांना प्रोत्साहपर पन्नास हजार रुपये निधी देण्याची घोषणा सरकारने केली होती. परंतु ती घोषणा अंमलात आली नाही. तसेच बांधावर जावून कोरडवाहू शेतकऱ्यांना २५ हजार तर फळबागा असलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याच्या घोषणेचा सरकारला विसर पडला असून शेतकऱ्यांच्या अडचणी तात्काळ सोडावाव्यात या मागणीसाठी भाजपाच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आंदोलन करण्यात आले.

हेही वाचलेच पाहिजे - सोयाबीनच उगवलेच नाही; मग सुरू झाला तक्रारींचा ओघ

पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अटक  सुटका
यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची अटक करुन सुटका केली. यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष प्रविण साले, मिलिंद देशमुख, विजय गंभीरे, दिलीप ठाकूर, अशोक पाटील धनेगावकर, व्यंकट मोकाले, बाबुराव शिंदे कासारखेडकर, उभनलाल यादव, कुणाल गजभारे, प्रभु कपाटे, सुनिल चव्हाण, अनिल हजारी, शीतल खांडील, सुर्यकांत कदम, सतीश बेरुळकर, बाळु लोढे, मारोती वाघ, सुनिल भालेराव, संदिप कऱ्हाळे आदींसह अनेकांची उपस्थिती होती. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video - BJP's agitation for distribution of crop loans to farmers, Nanded news