Video - नांदेडला काँग्रेसचा प्रतीकात्मक बैलगाडी लाँगमार्च 

अभय कुळकजाईकर
Friday, 2 October 2020

नांदेडला शुक्रवारी (ता. दोन आक्टोंबर) राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. दोन) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कॉँग्रेस पक्षाच्या वतीने प्रतीकात्मक बैलगाडी लाँगमार्च काढण्यात आला.

नांदेड - केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने शेतकरी आणि कामगार यांना देशोधडीला लावणारी विविध विधेयके संसदेमध्ये मंजूर करून घेतली. पाशवी बहुमताचा गैरवापर करून मंजूर करून घेतलेल्या या विधेयकाच्या निषेधार्थ कॉँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे. शुक्रवारी (ता. दोन आक्टोंबर) राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. दोन) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कॉँग्रेस पक्षाच्या वतीने प्रतीकात्मक बैलगाडी लाँगमार्च काढण्यात आला.  

नांदेडला या लाँगमार्चची सुरवात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता रेल्वेस्थानकासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. प्रतीकात्मक बैलगाडी लाँगमार्चमध्ये शेतकरी आणि कामगार यांनी सहभाग नोंदवला. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार रावसाहेब अंतापूरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांच्यासह कॉँग्रसचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लाँगमार्च दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महापालिकेतील माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर लाँगमार्चची सांगता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आली. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील एका कुटुंबातील पाच जणांनी घेतली सहस्त्रकुंड धबधब्यात उडी

शेतकरी, शेतमजूरांची फसवणूक - अशोक चव्हाण
केंद्र सरकारने शेतकरी, शेतमजूरांची फसवणूक केली असल्याचे सांगून पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, मोदी सरकार शेतकऱ्यांना शेतीमालासाठी आधारभूत किंमत देण्याबाबत बोलायला तयार नाही. पूर्वी इंग्रजांच्या काळात ईस्ट इंडिया कंपनी आली आणि आपल्यावर राज्य केले. त्यानुसार भाजपचे मोदी सरकार काही व्यापारी आणि उद्योजकांना हाताशी धरून ईस्ट इंडिया कंपनीसारखे वागत आहे. त्यानुसार कायदे करुन शेतकरी, शेतमजूर, कामगारांसह सर्वसामान्य जनतेची फसवणुक करत असल्याचाही आरोप श्री. चव्हाण यांनी केला. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेडला दररोज हजारावर स्वॅब अहवाल प्रतिक्षेत, गुरुवारी २२२ कोरोनामुक्त; १९५ जण पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात कायदा लागू करणार नाही
केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर हा कायदा पास करुन घेतला असला तरी महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी करु नये, अशी मागणी कॉंग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याची माहितीही पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी दिली. भाजपच्या सरकारने हा कायदा शेतकऱ्यांना तारायला केला की मारायला? त्याचबरोबर कामगार विषयक कायदेही कामगारांना मारक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राचे हे कायदे घातक असून त्याची राज्यात अंमलबजावणी करायची नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगितल्यानंतर त्यांनी याबाबत उपसमिती नियुक्त करण्याचे त्याचबरोबर शेतकरी, शेतमजूर, कामगारांचे रक्षण महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर शिष्टमंडळाने पालकमंत्री अशोक चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन सादर केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video - Congress's symbolic bullock cart long march to Nanded, Nanded news