Video - नांदेड महापालिकेत विविध प्रलंबित मागण्यांसाठी द्वारसभा 

अभय कुळकजाईकर
Monday, 5 October 2020

नांदेड वाघाळा महापालिकेतील कामगार, कर्मचारी तसेच कंत्राटी कामगारांच्या मागण्या, प्रश्न चर्चेअंती सुटावेत, यासाठी संघटनेच्या वतीने महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. याबाबत ता. आठ आणि ता. १८ सष्टेंबर रोजी प्रत्यक्षात भेटून चर्चाही करण्यात आली होती.

नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेतील कर्मचारी, कामगार तसेच कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी महापालिका कामगार, कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. पाच) सायंकाळी द्वारसभा घेण्यात आली. दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह महापौर, उपमहापौर, सभागृह नेता यांच्यासह पदाधिकाऱ्यांसोबत मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्यामुळे १५ दिवसांसाठी मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष गणेश शिंगे यांनी दिली.

नांदेड वाघाळा महापालिकेतील कामगार, कर्मचारी तसेच कंत्राटी कामगारांच्या मागण्या, प्रश्न चर्चेअंती सुटावेत, यासाठी संघटनेच्या वतीने महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. याबाबत ता. आठ आणि ता. १८ सष्टेंबर रोजी प्रत्यक्षात भेटून चर्चाही करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने महापालिकेसमोर द्वारसभा आणि निदर्शनांसह मंगळवारी (ता. सहा) महापालिकेवर धडक झाडू मोर्चाचेही आयोजन करण्यात आले होते. याबाबत नांदेड वाघाळा महापालिका कामगार, कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन देऊन इशाराही देण्यात आला होता.  
 

हेही वाचा - अधिक मास कोरोनाच्या सावटात, जावयांची मेजवानी हुकली : भेटवस्तूंही नाही 
 

मागण्यांसदर्भात प्रशासनाला निवेदन
महापालिकेत कायम व कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात महापालिका प्रशासनाने ता. चार आक्टोंबरपर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा ता. पाच आक्टोंबर रोजी महापालिका कार्यालयासमोर सायंकाळी चार वाजता निदर्शने व द्वार सभा घेण्यात येईल. त्याचबरोबर ता. सहा आक्टोंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा महापालिका कामगार, कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष गणेश शिंगे यांनी एका निवेदनाद्वारे दिला होता. त्याचबरोबर याबाबत निवेदन देऊन प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत चर्चाही करण्यात आली होती.  

हेही वाचलेच पाहिजे - ‘विष्णुपुरी’तून आतापर्यंत तीन हजार चारशे दलघमी विसर्ग

द्वारसभेनंतर झाला निर्णय
सोमवारी दुपारी महापालिकेसमोर कर्मचारी, कामगारांच्या उपस्थितीत द्वारसभा घेण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गणेश शिंगे, सचिव बी. के. पांचाळ, गंगाधर गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, सदस्य, कामगार उपस्थित होते. यावेळी मागण्यांसदर्भात उपस्थितांची भाषणेही झाली. दरम्यान, मागण्यांसंदर्भात आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह महापौर मोहिनी येवनकर, उपमहापौर मसूदखान, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले आदींसोबत सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी त्या मागण्या, समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मंगळवारी काढण्यात येणारा मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष गणेश शिंगे यांनी यावेळी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video - Dwara Sabha for various pending demands in Nanded Municipal Corporation, Nanded news