Video - नांदेडला महापौरपदासाठी मोहिनी येवनकर तर उपमहापौरपदासाठी मसूद खान यांचे अर्ज

अभय कुळकजाईकर
Saturday, 19 September 2020

नांदेड वाघाळा महापालिकेत महापौरपदासाठी कॉँग्रेसच्या मोहिनी विजय येवनकर यांनी तर उपमहापौरपदासाठी कॉँग्रेसचे मसूद खान यांनी शनिवारी (ता. १९ सष्टेंबर) दुपारी नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी सभागृह नेते वीरेंद्रसिंग गाडीवाले, विजय येवनकर, माजी महापौर अब्दुल सत्तार आदी उपस्थित होते.

नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेच्या महापौरपदासाठी निवडणुक होत असून कॉँग्रेसच्या नगरसेविका मोहिनी विजय येवनकर यांनी शनिवारी (ता. १९) दुपारी अर्ज दाखल केला, तर उपमहापौरपदी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मसूद खान यांनी अर्ज दाखल केला आहे. महापालिकेत कॉँग्रेसची एकहाती सत्ता असून कॉँग्रेसचाच महापौर व उपमहापौर होणार आहे. येत्या मंगळवारी (ता. २२) निवडणूक होणार असून त्यात फक्त अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

नांदेड महापालिकेत एकूण ८१ सदस्य असून त्यापैकी ७३ सदस्य कॉँग्रेसचे आहेत. भाजपचे सहा, शिवसेनेचा एक तर एक अपक्ष सदस्य आहे. त्यामुळे कॉँग्रेसचाच महापौर व उपमहापौर होणार हे निश्चित होते. यंदा महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे कॉँग्रेसच्या ओबीसी महिला प्रवर्गातून दहा सदस्या स्पर्धेत होत्या. त्यात अखेरच्या टप्प्यात मोहिनी विजय येवनकर यांनी बाजी मारली. उपमहापौरपदासाठीही जवळपास दहाजण इच्छुक होते. त्यामध्ये कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक माजी सभापती मसूद खान यांनी बाजी मारली. 

हेही वाचा - लालपरी धावते, मात्र पोटासाठी सारेच थकले

नगरसचिवांकडे केले अर्ज दाखल
शनिवारी (ता. १९) दुपारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून नावे जाहीर झाल्यानंतर नगरसचिव कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आले. महापौरपदासाठी मोहिनी येवनकर यांनी तर उपमहापौरपदासाठी मसूद खान यांनी नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांच्याकडे अर्ज सादर केला. महापौरपदासाठी सूचक म्हणून माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर उमेश पवळे यांची तर अनुमोदक म्हणून ज्येष्ठ नगरसेविका कांता मुथा आणि नगरसेवक राजेश यन्नम यांची स्वाक्षरी आहे. येवनकर यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड तेरा हजार पार - शनिवारी ३३२ कोरोना पॉझिटिव्ह, सात रुग्णांचा मृत्यू

मंगळवारी होणार निवडणुक
उपमहापौर पदासाठी सूचक म्हणून कॉँग्रेसचे सभागृह नेते वीरेंद्रसिंघ गाडीवाले आणि उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर तर अनुमोदक म्हणून माजी उपमहापौर आनंद चव्हाण आणि माजी सभापती किशोर स्वामी यांची स्वाक्षरी आहे. महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्यामुळे दोघांचीही निवड निश्‍चित झाली असून येत्या मंगळवारी (ता. २२) निवड होणार आहे. त्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी निवडीची औपचारिक घोषणा होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video - Mohini Yevankar for Nanded mayoral post and Masood Khan for deputy mayoral post, Nanded news