नांदेड महापालिकेत ‘स्थायी’च्या सभापतीपदी विरेंद्रसिंग गाडीवाले 

अभय कुळकजाईकर
Thursday, 31 December 2020

नांदेड महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात गुरूवारी सकाळी अकरा वाजता पीठासीन अधिकारी डॉ. विपीन यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभेला सुरूवात झाली. सभापतीपदासाठी विरेंद्रसिंग गाडीवाले यांचा एकमेव अर्ज आला होता. तो वैध ठरला. त्यानंतर पंधरा मिनिटांची मुदत देण्यात आली आणि नंतर गाडीवाले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी कॉँग्रेसचे विरेंद्रसिंग गाडीवाले यांची गुरूवारी (ता. ३१) बिनविरोध निवड झाली. जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह इतरांनी श्री. गाडीवाले यांचे स्वागत केले.
 
नांदेड महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात गुरूवारी सकाळी अकरा वाजता पीठासीन अधिकारी डॉ. विपीन यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभेला सुरूवात झाली. सभापतीपदासाठी विरेंद्रसिंग गाडीवाले यांचा एकमेव अर्ज आला होता. तो वैध ठरला. त्यानंतर पंधरा मिनिटांची मुदत देण्यात आली आणि नंतर गाडीवाले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांच्यासह सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा - हिंगोली : शेवाळा गावात बिबट्या दिसला, ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण

पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत
निवडीनंतर सभापती गाडीवाले यांचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी येवनकर, उपमहापौर मसूद खान, माजी महापौर अब्दुल सत्तार, विजय येवनकर, माजी सभापती अमितसिंह तेहरा, किशोर स्वामी, उमेश पवळे, माजी उपमहापौर आनंद चव्हाण आदींनी स्वागत केले. स्वागतानंतर श्री. गाडीवाले यांनी मुख्य सचखंड गुरूद्वारा येथे जाऊन दर्शन घेतले. 
 
शीख समाजातील पहिले सभापती 
शीख समाजातून स्थायी समिती सभापतीपदाचा मान मिळवणारे विरेंद्रसिंग गाडीवाले हे पहिले सभापती ठरले आहेत. गुरूता गद्दीच्या त्रिशताब्दी सोहळ्याच्या वेळी २००८ त्यांचे वडील बलवंतसिंग गाडीवाले हे शीख समाजाचे पहिले महापौर ठरले होते. पालकमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आपल्याला सभापतीपदाची संधी दिली. त्यांचा विश्वास आपण विकासाच्या माध्यमातून सार्थ ठरवू, असा विश्वास नवनिर्वाचित सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी व्यक्त केला.

हेही वाचलेच पाहिजे - जिल्ह्यात कोरोनाचा लपंडाव सुरुच; गुरुवारी ४२ पॉझिटिव्ह, ३७ रुग्ण कोरोनामुक्त 

सभागृह नेतेपदासाठी चुरस
सभापतीपद स्विकारल्यानंतर श्री. गाडीवाले यांना सभागृह नेतेपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे नवीन सभागृह नेता कोण होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सभागृह नेता म्हणून माजी सभापती अमितसिंह तेहरा, किशोर स्वामी, माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर आनंद चव्हाण आदींची नावे चर्चेत आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय पालकमंत्री अशोक चव्हाण घेणार असल्यामुळे आता कोणाचे नाव येणार? याकडे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virendrasingh Gadiwale as the Chairman of 'Standing' in Nanded Municipal Corporation, Nanded news