नांदेडमधील महिलांनी हातात घेतला एकतेचा झेंडा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

एकमेकांतील मतभेद दूर करून हिंदू समाज एकवटला पाहिजे, सर्व जाती-भेद नष्ट झाला पाहिजे यासाठी नांदेडमधील महिला मंडळाचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

नांदेड : समाजामध्ये जातीयतेची तेढ निर्माण होत असल्याने सर्वीकडे अशांतता पसरलेली आहे. अशावेळी शहरातील काही महिलांनी एकत्रित येऊन, संसारीक सर्व जबाबदारी सांभाळून समाजातील जातीयतेची दरी दूर करण्यासाठी एकतेचा झेंडा हाती घेतला आहे.

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया..., गोड तुझे रुप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्वकाळ...या जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाला अनुसरून फरांदेनगर येथील महिला गेल्या १५ वर्षांपासून नियमित भजन-गायन करतात. यातून महिलांचे एकत्रिकरण करून विचारांची देवाणघेवाणही करतात.

हेही वाचा - Video-कोरोना : रोगप्रतिकारक शक्ती वाढविणेच एकमेव उपाय

शिवाय कर्तृत्ववान महिलांचा गौरवासोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करून त्यांना शिकण्याचे बळ देत आहेत. नवरात्रामध्ये कन्यापूजन होते. सर्व जातीपातीच्या भिंती ओलांडून या महिला ताला-सुरामध्ये भजन गायनासोबतच देवींची पदेही सादर करतात.

उर्मिला जाजू, मीनाक्षी गोगटे, सरोज शर्मा या महिलांनी पंधरा वर्षांपूर्वी महालक्ष्मी महिला भजन मंडळाची स्थापना केली. सुरवातीला आठच महिला गणपती मंदिरामध्ये भजन-गायन करीत असत. कालांतराने परिसरातील महिलांनाही भजनगायनाची गोडी वाटू लागली. त्याही मंदिरात यायला लागल्या. त्यातून मंडळातील सदस्यांची संख्या वीसवर गेली तेव्हापासून नियमित भजनगायनासोबतच देवींच्या गीतांचाही या सदस्या सादरीकरण करतात.

हे देखील वाचाच - कुणी आणली आशा वर्करवर उपासमारीची वेळ ?...वाचा

महिलांचे एकत्रिकरण करून त्यांना स्वावलंबी बनवावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी, संसारातील रिकामा वेळ सत्कारणी लागावा या उद्देशाने या महिला भजनगायन करतात. नवरात्रामध्ये सलग नऊ दिवस देवींच्या गीतांचा जाहीर कार्यक्रम मंडळाचे होतात. शिवाय गोकुळाष्टमी, एकादशी आणि प्रत्येक शुक्रवारी भजनाचा जागर करतात.

मंगळागौर, डोहाळे, बारसे आदी कार्यक्रमही मंडळातील सदस्या दणक्यात सादर करतात. भारुड तसेच गीतांच्या माध्यमातून स्त्रीभ्रूणहत्या, वृक्षारोपण, पाण्याची बचत अशा ज्वलंत विषयांवरही प्रबोधन मंडळातर्फे करण्यात येते. मंडळाचा नांदेड आकाशवाणीवर पाच मे २०१७ रोजी घर संसार या कार्यक्रमात मंडळाचा प्रोत्साहनपर कार्यक्रम झाला.

येथे क्लिक करा - टपाल विभाग अंधाराची दृष्टी व अपंगांची काठी

महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, नवरात्रामध्ये कन्या पूजन आदी सामाजिक उपक्रमही मंडळातर्फे सातत्याने राबविले जातात. कोल्हापूर येथे झालेल्या झी-२४ तास वाहिनीवरील स्पर्धेत दुसरा क्रमांक मंडळाने पटकाविला. शिवाय विविध भजन स्पर्धांत नियमित सहभागी होऊन बक्षिसे पटकाविण्याची मंडळाची परंपराही या सदस्यांनी अखंडित ठेवली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women In Nanded Carry The Flag Of Unity Nanded News