esakal | येळकोट येळकोट जय मल्हार : तीनशे वर्षांची परंपरा खंडित; माळेगाव यात्रा रद्द, मंदिरातच विधीवत पूजा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo


माळेगाव यात्रा आणि कोरोना सावट , करोडोंची उलाढाल थांबली, निजाम काळातही सुरु होती माळेगाव यात्रा.

येळकोट येळकोट जय मल्हार : तीनशे वर्षांची परंपरा खंडित; माळेगाव यात्रा रद्द, मंदिरातच विधीवत पूजा

sakal_logo
By
एकनाथ तिडके

माळाकोळी (ता. लोहा, जिल्हा नांदेड) : दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगाव खंडोबा यात्रा यावर्षी जागतिक महामारी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याचे अधिकृत पत्र जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी काढले आहे. यामुळे माळेगाव यात्रा येथे होणारी करोडो रुपयांची उलाढाल मात्र यावर्षी थांबणार आहे. याशिवाय विशेष बाब म्हणजे तीनशे वर्षाच्या इतिहासात माळेगाव यात्रा यावर्षी पहिल्यांदाच खंडित झाल्याचे जाणकार सांगतात. निजाम काळातही माळेगाव यात्रा बंद झाली नसल्याचे इतिहासकारांचे मत आहे. यावर्षीची माळेगाव यात्रा ता. ११ जानेवारी आहे. यावर्षी मंदिरामध्ये पूजा-अर्चा करून फक्त विधि पूर्ण करण्यात येणार असल्याचे देवस्थान कमिटीकडून कळविण्यात आले आहे.

खंडोबाच्या यात्रांमध्ये मोठी यात्रा माळेगावच्या खंडोबाची यात्रा. ही यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या जवळच्या असणाऱ्या आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती प्रदेशातील भटक्या विमुक्त, व्यापारी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी पर्वणीच असते. माळेगाव यात्रे संदर्भात असे म्हटले जाते, "की आई सोडून सर्वच या यात्रेत मिळत..." सर्वसामान्य नागरिकांची हक्काची बाजारपेठ म्हणजे माळेगाव यात्रा...माळेगाव यात्रेत एक रुपयाच्या सुईपासुन ते वीस लाखाच्या अश्वापर्यंत सर्व काही मिळते. यामध्ये खेळणी, भांडी, कपडे, स्वेटर, जनावरांच्या झुली, खोगीर, म्होरकी, चाबुक, कुंकु, सौंदर्य प्रसाधने, संसारउपयोगी साहीत्य, ताडपत्री, कारपेट, चादरी, शेती अवजारे, प्रसाद, मिठाई, काठी घोंगडे, मनोरंजन, यासह लहान मोठ्या अनेक वस्तु एकत्र याच यात्रेत मिळतात. पूर्वी तीन- तीन महिने माळेगावची यात्रा भरत असे सध्या ती पाच दिवस भरते. अश्व बाजारापासून ते इतर सर्वच यात्रेत एकत्रित मिळून करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल दरवर्षी होत असते. मात्र यावर्षी जागतिक महामारी कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर अनेक बाबींवर प्रतिबंध असल्यामुळे माळेगाव यात्रा यावर्षी भरणार नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन विटणकर यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील इतरही मोठमोठ्या यात्रा यावर्षी रद्द करण्यात आल्या आहेत यामध्ये आळंदी ,पंढरपूर, जेजुरी, मढी, सारंखेडा अशा राज्यातील मोठ्या यात्रा कोरणा विषाणू संसर्गामुळे प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत.

हेही वाचाखळबळजनक  ! महाराष्ट्रात पोहोचला Bird Flu, मुरूंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच

लहान व्यापार्‍यांवर उपासमारीची वेळ

माळेगाव यात्रा कोरोना विषाणू संसर्गामुळे रद्द करण्यात आली असल्यामुळे या यात्रेत येणारे राज्यभरातील व इतर राज्यातील लहान व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी संपूर्ण वर्षभराची बेगमी फक्त माळेगाव यात्रेत कमावून संसार चालवणारे अनेक लहान व्यापारी आहेत, या व्यापाऱ्यांची भिस्त माळेगाव यात्रेवरच अवलंबून असते मात्र या वर्षी यात्रा होणार नसल्यामुळे नक्कीच उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. खेळणी, कुंकू, भंडारा, प्रसाद, पानठेला व इतर हॉटेल्स, आकाश पाळणे, सर्कस, टुरिंग टॉकीज या व्यापाऱ्यांचे यात्रा होणार नसल्यामुळे आर्थिक नुकसान होणार आहे.

मनोरंजन

या यात्रेत महाराष्ट्राची लोककला असलेली वाघ्यामुरळी, गोंधळी, वारु, आराध्यांची गाणी, ढोलकी- फडाच्या तमाशा मंडळे, संगीतबारी याशिवाय बहुरुपी , रायरंदर, वासुदेव, स्मशान जोगी, कुडमुडवाले,अशा विविध लोककलावंतांनी सादर केलेल्या कलांचे दर्शन या यात्रेत होते. या यात्रेत महाराष्ट्राच्या लोककलेला राजाश्रय मिळाला आहे. कंधारचे माजी सभापती व्यंकटराव मुकदम यांनी ही कला एकत्रीत कलामहोत्सवाच्या माध्यमातुन एकाच व्यासपीठावर आणली त्यांना कला सादर करण्यासाठी संधी दिली व बक्षीस रुपात मानधन ही देण्याची परंपरा सुरु केली पंचवीस वर्षापासुन ही परंपरा आजही सुरु आहे. शिवाय मागील सात वर्षापुर्वी तत्कालीन अध्यक्ष दिलीप बेटमोगरेकर यांनी माळेगाव यात्रेत लावणी महोत्सवाची परंपरा सुरु केली . सर्व कलावंतांसाठी माळेगाव यात्रा म्हणजे पंढरी असते माळेगाव यात्रेला कलावंतांची पंढरी असे म्हटले जाते राज्यातील इतर यात्रे पेक्षा या यात्रेत या कलावंतांना जास्तीचा बहुमान शिवाय आर्थिक उत्पन्न सुद्धा होत असते. मात्र यावर्षी यात्रा होत नसल्यामुळे या कलावंतांना उपासमारीचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे याबाबत अनेक कलावंतांनी व्यक्त केला आहे. व कोरोना विषाणू संसर्ग या पार्श्‍वभूमीवर योग्य त्या खबरदारी घेऊन कलावंतांना आपल्या कला सादर करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

येथे क्लिक कराकाय म्हणता ? शहरालगत गोदावरीचे 30 टक्के पाणी प्रदूषित

खंडोबाचा उत्सव व यात्रा दरवर्षी मार्गशीर्षातील वद्य एकादशीला सुरु

खंडोबाचा उत्सव व यात्रा दरवर्षी मार्गशीर्षातील वद्य एकादशीला सुरु होते. या दिवशी देवस्वारीची गावातून पालखी निघते. यावेळी रिसनगावचे नाईक यांचा प्रमुख मान असतो. रिसनगाव माळेगावापासून १५ ते २० कि.मी. अंतरावर आहे. या घराण्यातील वीर नागोजी नाईक यांच्यापासुन सुरु झालेला मान  वंश परंपरेने आता यात्रेतील पालखीचा मान या कुटुंबातील संजय नाईक चालवतात. तर कंधारजवळ असलेल्या भोसी गावातील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोटय़ाचा मान आहे. माळेगावची यात्रा सुप्रसिद्ध असून यावेळी भरणारा गुरांचा बाजार, दर्जेदार कृषी व पशुपर्दशन ही यात्रेची वैशिष्टे आहेत. यात्रेला ३०० वर्षाची परंपरारा असल्याचे जानकारांकडुन समजते. तीनशे वर्षात माळेगाव यात्रा कधीही बंद पडली नाही किंवा खंडितही झाली नाही. असे येथील जाणकार सांगतात निजाम सरकारच्या काळात सुद्धा ही यात्रा बंद झालेली नव्हती मात्र या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर तीनशे वर्षांच्या इतिहासात माळेगाव यात्रा पहिल्यांदाच खंडित झालेली आहे. निजाम काळात सुद्धा माळेगाव यात्रा कधीही बंद झाली नव्हती असे इतिहासकारांचे मत आहे. या काळात माळेगाव यात्रेची जबाबदारी कंधारचे जागीरदार राजे गोपाल सिंह यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते.

संपादन - प्रल्हाद कांबळे