चौकटी भेदणारी अभिनयप्रतिभा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

अनुराग कश्‍यपपासून अनुराग बोसपर्यंतच्या दिग्दर्शकांच्या प्रोजेक्‍टमध्ये सातत्यानं झळकत तिनं आपलं वेगळेपणही सिद्ध केलं आहे. व्हर्सटाइल राधिकाच्या प्रवासाबद्दल....

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये बोटावर मोजण्याइतक्‍याच मराठी मुली पाय रोवण्यात यशस्वी होत असताना राधिका आपटेनं अल्पावधीत मिळवलेलं यश नक्कीच अभिमानास्पद आहे. अनुराग कश्‍यपपासून अनुराग बोसपर्यंतच्या दिग्दर्शकांच्या प्रोजेक्‍टमध्ये सातत्यानं झळकत तिनं आपलं वेगळेपणही सिद्ध केलं आहे. चांगली भूमिका असल्यावर ती कुठं साकारायची आहे किंवा भाषा कोणती, याचा विचार न करता काम करण्याच्या तिच्या धडाडीमुळे अनेक वेगळ्या धाटणीच्या भूमिका तिच्या वाट्याला आल्या आहेत. व्हर्सटाइल राधिकाच्या प्रवासाबद्दल....

राधिका आपटे पुण्यातील एका प्रथितयश डॉक्‍टरांची मुलगी. मोहित टाकळकरच्या ‘आसक्त कलामंच’च्या माध्यमातून भूमिका करताना ती अभिनयाच्या क्षेत्रात स्थिरावण्यास सुरुवात झाली. ‘तू’, ‘पूर्णविराम’सारख्या नाटकांतून केलेल्या तिच्या भूमिकांची चर्चा झाली व लवकरच ती मोठ्या पडद्यावरील भूमिकांत झळकू लागली. श्रीराम राघवनदिग्दर्शित ‘बदलापूर’ व केतन मेहतांचा ‘मांझी ः द माउंटन मॅन’, अक्षयकुमारबरोबरचा ‘पॅडमॅन’, आयुष्यमान खुराणाबरोबरचा ‘अंदाधून’ व ‘कबाली’मध्ये थेट रजनिकांतची पत्नी, असा तिचा चढता आलेख आहे. ‘तुम्ही वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करता तेव्हा कलाकार म्हणून तुमची खूप वेगानं प्रगती होते. ‘मांझी’मधील फगुनिया साकारण्याआधी मी बिहारमधील खेड्यामध्ये जाऊन राहिले, तेथील महिला कशा राहतात, बोलतात याचा अभ्यास केला,’ असं ती सांगते. 

बहुभाषक...
राधिकाचा सुमित्रा भावे व सुनील सुकथनकरदिग्दर्शित ‘घो मला असला हवा’ हा नायिका म्हणून पहिला मराठी चित्रपट. त्यानंतर तिचा रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेला ‘लई भारी’ हा चित्रपट गाजला. मराठीबरोबर बंगाली, तेलगू, तमीळ या भाषांतही राधिकानं अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्याबद्दल ती म्हणते, ‘मला भाषेच्या या भिंती मान्यच नाहीत. कलाकाराला कोणत्याही भाषेत काम करता यायला पाहिजे. मला कथा आवडल्यास मी भाषेचा विचार करीत नाही.’ राधिकानं छोट्या पडद्यावर अनुराग बोस यांच्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कथांवर आधारित एका मालिकेत ‘चोकेर बाली’ या कथेवर आधारित भूमिका केली होती. मूळ बंगाली चित्रपटामध्ये ऋतुपर्ण घोष यांच्या दिग्दर्शनाखाली ऐश्‍वर्या रायनं साकारलेली प्रमुख भूमिका राधिकानं या भागात साकारली. राधिकानं अनेक मराठी, हिंदी व इंग्रजी नाटकांमधूनही भूमिका साकारल्या आहेत. लंडनमध्ये इंग्रजी नाटकांमधून भूमिका साकारण्याचा मानसही ती बोलून दाखवते!

शॉर्ट फिल्म आणि ओटीटी
राधिकानं शॉर्ट फिल्म आणि ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवरही अनेक भूमिका साकारल्या आहेत. ‘अहल्या’ या सुजय घोष यांच्या शॉर्ट फिल्मची मोठी चर्चा झाली होती. त्याचबरोबर ‘नेटफ्लिक्स’वर ‘लस्ट स्टोरीज्’, ‘सेक्रेड गेम्स’, ‘रात अकेली है’ आदी मालिकांतून ती घराघरांत पोचली आहे. भविष्यातही राधिका ही प्रयोगशील वृत्ती कायम ठेवत प्लॅटफॉर्म किंवा भाषेचा विचार न करता आपल्या भूमिकांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करीत राहील, यात शंकाच नाही...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article About Versatile Radhika apte journey