या देवी सर्वभूतेषु...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 September 2017

नाशिक - ‘या देवी सर्वभूतेषु शक्ती-रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ... संपूर्ण प्राणिमात्रांमध्ये शक्तिरूपाने वसणाऱ्या देवीचे नमन करीत आज सर्वत्र घटस्थापना करण्यात आली. 

नाशिक - ‘या देवी सर्वभूतेषु शक्ती-रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ... संपूर्ण प्राणिमात्रांमध्ये शक्तिरूपाने वसणाऱ्या देवीचे नमन करीत आज सर्वत्र घटस्थापना करण्यात आली. 

ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. पहाटे पाचला राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्य शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते मंत्रोच्चारात विधिवत पूजन करून घटस्थापना करण्यात आली. महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते देवीची षोडशोपचारे पूजा करून आरती करण्यात आली. पहिल्या दिवशी भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेला होता. अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिरात पहाटे पाचला संतोषगिरी महाराज यांच्या हस्ते मंत्रोच्चारात पूजन करण्यात आले. सकाळी सातला महापौर रंजना भानसी यांनी कुटुंबीयांसोबत अभिषेक करून आरती केली. नगरसेवक अरुण पवार, माजी नगरसेविका शालिनी पवार, पोपटराव भानसी यांच्यासह कालिकामंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, कोशाध्यक्ष सुभाष तळाजिया, सुरेंद्र कोठावळे, किशोर कोठावळे, आबा पवार, विजय पवार, संतोष कोठावळे आदींसह भाविक उपस्थित होते.

प्रारंभी सनईच्या मंगलमय सुरात कालिकादेवीची आराधना करण्यात आली. पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. पोलिस व महापालिका प्रशासन यांच्यातील वादामुळे परिसरातील गाळ्यांचा विषय अधांतरीत राहिला.

दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी
घटस्थापनेच्या पहिल्या माळेचे औचित्य साधत भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. यात्रोत्सवावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह पोलिस, गृहरक्षक दल यांची देखरेख असेल. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी खेळणीची संख्या कमी असल्याने बच्चेकंपनीने नाराजी व्यक्त केली.

भक्तनिवासाचे आज लोकार्पण
कालिकादेवी ट्रस्टतर्फे बांधण्यात आलेल्या भक्तनिवासाचे लोकार्पण आज होऊ शकले नाही. उद्या (ता. २२) सकाळी अकराला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भक्तनिवासाचे लोकार्पण होईल. याप्रसंगी महापौरांसह शहराचे तिन्ही आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती देवस्थानतर्फे देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news kalikadevi navratrotsav