Navratri festival 2019 : मंगळागौरीच्या खेळांतून ‘फिटनेस फंडा’

नीला शर्मा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांचा आधुनिक काळातील ‘फिटनेस फंडा’ म्हणून उपयोग करीत ॲड. अर्चना नार्वेकर यांनी कल्पकता दाखवली आहे. या खेळांच्या कार्यक्रमाबरोबरच त्यांचं प्रशिक्षणही त्या देतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य वाढविण्यासाठी पिंगा, फुगड्या व गाठोडं घालायला त्या अनेक महिलांना प्रेरित करतात.

ॲड. अर्चना नार्वेकर यांना सत्तरहून जास्त प्रकारच्या पारंपरिक फुगड्या लीलया घालता येतात. त्यापैकी शयनफुगडी, गाठोडंफुगडी असे शब्द ऐकून आपल्याला आधी काहीच कळत नाही. नंतर त्यांचं दमदार सादरीकरण बघून थक्क व्हायला होतं.

हे खेळ शिकू पाहणाऱ्यांच्या लक्षात येतं की, यात आपलं शारीरिक बळ, लवचिकता यांचा कस लागतो आहे. शिवाय एकाग्रता, सभोवतालचं भान पणाला लागत आहे. या खेळांमधून सर्वांगीण व्यायाम नकळत होऊन जातो, ही गंमतही कळते.  मैत्रिणींच्या सहभागाचं महत्त्वंही उमगतं. शरीराबरोबरच मनाचं संतुलन साधलं गेल्याचा आनंद मिळतो. 

अर्चनाताई म्हणाल्या, ‘‘पूर्वी जीम नसायचे. पारंपरिक गाणी, लयबद्ध खेळांमधून स्त्रियांची मनोरंजनाबरोबर ताकद वाढायची. झिम्मा, फुगडी, पिंगा, खुर्ची का मिर्ची वगैरे तऱ्हेतऱ्हेच्या खेळांमधून व्यायाम घडायचा. मनावरचाही ताण हलका व्हायचा. नाती घट्ट व्हायला मदत व्हायची. आधुनिक काळात या खेळाचं पुनरुज्जीवन करायचा ध्यास मी घेतला आहे. त्यासाठी निरनिराळ्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मैत्रिणींचा ‘मानिनी मंगळागौर ग्रुप’ स्थापन केला आहे. या माध्यमातून आम्ही विविध ठिकाणी कार्यक्रम करतो. केवळ फुगड्यांचेही अनेक प्रकार पाहून प्रेक्षकांना नवल वाटतं. मग शिकण्याची इच्छा असेल त्यांचं प्रशिक्षणही आम्ही करतो.’’ 

अर्चनाताई पंधरा वर्षांपासून वकिली करतात. महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी त्यांनी ‘उत्कर्ष स्त्री संचयनी संघ’ स्थापन केला. घटस्फोट टळावेत म्हणून कौटुंबिक 

समुपदेशन, रस्ता अपघातात विमा कायद्यासंदर्भात मदतकार्य अशा आघाड्यांवर त्या कार्यरत आहेत.

मनोरंजन व व्यायामाचा दुहेरी आनंद 
मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांमध्ये गायन, नाट्य व क्रीडाप्रकार असा गोफ विणलेला असतो. यातून हसतखेळत सर्वांगीण व्यायाम कधी होतो, ते कळतही नाही. यामुळे आधुनिक जीवनशैली जगणाऱ्या तरुणींनाही या खेळाचं आकर्षण वाटू लागलं आहे. यात आम्ही आधुनिक काळातील चित्रपटगीतंही वापरल्यामुळे रंजकता वाढते. कोणत्या खेळामुळे कोणत्या सांध्यांना व्यायाम घडला याचा विचार जागरूकतेनं महिला करतात, असे नार्वेकर यांनी सांगितलं.

पारंपरिक खेळांना 
आधुनिकतेची जोड 
जुन्या कलेचं पुनरुज्जीवन 
सामूहिकतेतील आनंदाची ओळख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri festival 2019 Archana narvekar fitness funda