करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराबाहेर 60 सीसी टीव्ही कॅमेरे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - नवरात्रोत्सवासाठी अंबाबाई मंदिरासह शंभर मीटर अंतरापर्यंत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. परिसरात बसवविण्यात आलेल्या 60 सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे प्रत्येक गोष्टीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

कोल्हापूर - नवरात्रोत्सवासाठी अंबाबाई मंदिरासह शंभर मीटर अंतरापर्यंत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. परिसरात बसवविण्यात आलेल्या 60 सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे प्रत्येक गोष्टीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी दहशतवाद विरोधी पथकासह, राज्य राखीव दल आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचीही मदत घेतली जाणार आहे. पालखीच्या वेळी होणाऱ्या गर्दीच्या नियोजनासाठी त्यांची मदत होणार असल्याचे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले. 

जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील स्क्रिनचीही मदत 
नवरात्रोत्सवात देशभरातून लाखो भाविक अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येत असतात. विधानसभा निवडणुकीमुळे भाविकांच्या गर्दीत लक्षणीय वाढ होईल, अशी शक्‍यता आहे. भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्याबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस यंत्रणेने आवश्‍यक उपायोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंदिरा व्यतिरिक्त परिसरात पोलिस यंत्रणेने 60 सीसी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या सीसी टीव्हीवर नियंत्रण कक्षातून वॉच ठेवला जाणार आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील स्क्रिनचीही मदत पालखीच्या वेळी घेण्यात येणार आहे. 

शंभर मीटरच्या आत फेरीवाल्यांना प्रवेश बंदी 
नवरात्रोत्सव काळात भाविकांच्या गर्दीचा विचार करून मंदिरापासून शंभर मीटर अंतराच्या आत फेरीवाले, विक्रेत्यांना थांबण्यास बंदी करण्यात येणार आहे. गर्दीचे नियोजनासाठी उत्सव काळा पुरता हा निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत संबधितांवर कारवाईसाठी महापालिका यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. 

दहशतवाद पथकाची करडी नजर... 
मंदिर व परिसरात दहशतवाद विरोधी पथकाकडून मंदिराची दररोज तपासणी केली जाते. चारही प्रवेशद्वारावरील बंदोबस्तासह सीसी टीव्ही कॅमेऱ्यावर वॉच ठेवला जात आहे. नागरिकांनी कोणत्या अफवांवर विश्‍वास ठेऊ नये. बेवारस वस्तूंना हात लावू नये. याबाबत पोलिसांना माहिती द्यावी असे प्रबोधनही करण्यात येत आहे. नवरात्रोत्स काळात दिवसभर हे पथक तैनात राहणार आहे. 

भिकाऱ्यांबाबतही उपायोजना 
नवरात्रोत्सव काळात भिकाऱ्यांनाही मंदिर व परिसरातील भिकाऱ्यांबाबतही योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. याबाबतचे नियोजन सातारा येथील भिक्षेकरी गृहामार्फत केले जावे यासंबधीचा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यांच्याकडून येत्या दोन दिवसात या उपाययोजना करण्यात येणार आहेत. 

चोरट्यांवर विशेष लक्ष... 
नवरात्रोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन चेन स्नॅचिंग, पाकीटमार करणाऱ्या चोरट्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यासाठी साध्या गणवेशातील विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. पहाटे पासून ते रात्री मंदिर बंद होई पर्यंत हे पथक येथे कार्यरत असणार आहे. 

मदत कक्ष... 
गर्दीत चुकलेल्या लहान मुलांसाठी मंदिराबाहेर मदत कक्ष तयार करण्यात येणार आहे. मंदिरात चुकलेली मुलांच्या नावांचा आणि पालकांचा उल्लेख या मदत कक्षातून माईकवरून करण्यात येणार आहे. याचा पालकांना चांगला उपयोग होणार आहे. 

सेवा संस्थाना आवाहन 
मंदिरापासून मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थाकनला जाण्याचा मार्ग होणारे बस व रिक्षाचे सरासरी प्रवासी भाडे किती होणार, याची माहिती भाविकांना मिळाली तर त्याची आर्थिक लूट कोणी करू शकणार नाही. यासाठी याबाबत फलक मंदिर परिसरात आणि मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन येथे लावावे असे आवाहन जुना राजवाडा पोलिसांतर्फे शहरातील सेवा संस्थाना करण्यात आले असल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 CCTV in Ambabai Temple Kolhapur