Navratri Festival 2019 : जागर आदिशक्तींचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता मंदिरात मंगलमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवास रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात दुपारी बाराच्या सुमारास घटस्थापना करण्यात आली. ऊठ अंबे झोपी नको जाऊ, या विष्णुदासाच्या प्राचीन कवनाने तुळजाभवानी मातेची शेजघरातील निद्रिस्त मूर्ती रविवारी पहाटे चरणतीर्थानंतर देवीच्या मुख्य गाभाऱ्यात सिंहासनावर अधिष्ठित करण्यात आली.

शारदीय नवरात्रोत्सवास सुरवात
तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता मंदिरात मंगलमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवास रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात दुपारी बाराच्या सुमारास घटस्थापना करण्यात आली. ऊठ अंबे झोपी नको जाऊ, या विष्णुदासाच्या प्राचीन कवनाने तुळजाभवानी मातेची शेजघरातील निद्रिस्त मूर्ती रविवारी पहाटे चरणतीर्थानंतर देवीच्या मुख्य गाभाऱ्यात सिंहासनावर अधिष्ठित करण्यात आली. त्यानंतर देवीचे पहाटेच अभिषेक झाले. प्रारंभी छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचा अभिषेक झाल्यानंतर देवीस अन्य भाविकांच्या सिंहासन पूजा, पंचामृतांचे अभिषेक झाले. पहाटे पाचपर्यंत अभिषेक, धुपारती आणि अंगारा मिरवणूक झाली. देवीचे नित्योपचार अभिषेक पूजा सकाळी सहा वाजता सुरू झाली. दहा वाजता नित्योपचार अभिषेक पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी मातेस भोपे पुजाऱ्याच्या घरातील नैवेद्य दाखविण्यात आला.

वणीत नवरात्रीपर्वाला प्रारंभ
वणी -
 मांगल्य, चैत्यन्य व उत्साहाचे प्रतीक असलेल्या आदिशक्ती सप्तशृंगीमातेच्या नवरात्रीपर्वाला ‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते’, मंत्रघोष व ‘अंबे माते की जय’, ‘सप्तशृंगी माते की जय’च्या जयघोषात रविवारी सुरवात झाली. गडावर दोन हजारांहून अधिक महिलांनी घटस्थापना केली. पहिल्याच दिवशी सुमारे तीस हजार भाविक आदिमायेच्या चरणी नतमस्तक झाले. घटस्थापनेच्या पूर्वसंध्येलाच शनिवारी (ता. २८) घटस्थापनेसाठी हजारो भाविकांबरोबरच पोलिसांचा लवाजमा, इतर प्रशासकीय यंत्रणा गडावर दाखल झाली होती. रविवारी (ता. २९) सकाळी ७ वाजता सप्तशृंगी निवासिनीदेवी न्यासच्या कार्यालयापासून पुरोहितांना पूजेचे वर्णी दक्षिणा देऊन देवीच्या आभूषणांची जिल्हा व सत्र न्यायालय प्रबंधक महेंद्र मंडाले व न्यासचे विश्वस्त रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर आभूषणांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. 

रेणुकादेवीची उत्साहात घटस्थापना 
माहूर (जि. नांदेड) -
 महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूरगडावरील श्रीरेणुकादेवीची रविवारी सकाळी साडेअकरा वाजता संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. आई जगदंबेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. घटस्थापनेनंतर नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. माहूरगडावर सनई-चौघड्यांच्या मंगलस्वरात रविवारी सकाळी सात वाजता श्रीरेणुकादेवीची विधिवत पूजा, अभिषेकास सुरवात झाली. घटस्थापनेनंतर श्रीरेणुकादेवीची महाआरती करण्यात आली.

श्रीरेणुकादेवीच्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला सकाळी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्नीक श्रीरेणुकादेवीची विधिवत पूजा, अभिषेक करून महाआरती केली. त्यानंतर सकाळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सपत्नीक दर्शन घेऊन महाआरती केली. 

महापूजेने नवरात्रोत्सवास प्रारंभ
अंबाजोगाई (जि. बीड) -
 प्रसिद्ध शक्तिपीठ व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरीदेवीच्या नवरात्र महोत्सवास रविवारी सकाळी दहाला घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. तहसीलदार व योगेश्‍वरीदेवी समितीचे अध्यक्ष संतोष रुईकर व त्यांच्या पत्नी कमल रुईकर यांनी योगेश्‍वरीदेवीची विधिवत महापूजा केली. यानंतर योगेश्‍वरीदेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. २९ सप्टेंबर ते आठ ऑक्‍टोबरदरम्यान श्री योगेश्‍वरीदेवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. रविवारी सकाळी मंदिरात घटस्थापना व महापूजेने महोत्सवास प्रारंभ झाला. तहसीलदार संतोष रुईकर दांपत्याने देवीची विधिवत महापूजा केली. योगेश्‍वरीदेवीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त रविवारपासून मंदिर परिसरात कीर्तन, प्रवचन, भजन आदी उपक्रम सुरू झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Navratrotsav Jagar Aadishakticha