कोल्हापूर : कोहाळ विधीच्या थरारात त्र्यंबोली यात्रा उत्साहात 

कोल्हापूर : कोहाळ विधीच्या थरारात त्र्यंबोली यात्रा उत्साहात 

कोल्हापूर - दुष्ठ शक्तीचा नाशकरून प्रजेला सुख शांती देण्यासाठी त्र्यंबोली देवीने कोल्हासूर राक्षसाचा वध केला याच धार्मिक कृतीच्या स्मृती जागवणारी कोहाळ पंचमी यात्रा आज त्र्यंबोली देवी टेकडीवर भरली. हजारो भाविकांच्या साक्षीने गौरी गुरव या बालिकेकडून कोहाळ रूपी कोल्हासूराच वध झाला आणि अवघ्या क्षणात कोहाळाची शकलं मिळवण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली.

युक्ती, शक्तीच्या बळावर एकमेकांच्या हातून कोहाळ्याची शकलं हिसकावण्यासाठी झटापट, रेटारेटी, धावपळ उडाली, आणि त्र्यंबोली टेकडी अक्षरशः थरारली, शौर्याची परंपरा जागवली. मात्र पूजा विधी होताच काही हुल्लडबाजांनी एकमेकांना धक्काबुक्की चेंगरा चेंगरी करीत या सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला त्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला. 

नवरात्र उत्सवा निमित्त आज पाचव्या माळेला दरवर्षी प्रमाणे त्र्यंबोली टेकडीवर ललित पंचमी यात्रा भरली. प्रथेनुसार त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी साडे तीन शक्तीपीठा पैकी एक असलेली आई आंबाबाई देवी भेटीला येते त्याचे प्रतिक म्हणून आंबाबाईची पालखी, तुळजाभवानी देवीची पालखी, गुरू महाराज आखाडा पालखी सोहळा लवाजम्यासह वाजत गाजत निघाला. बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, उमा टॉकीज मार्गे एक पालखी शाहू मिलमध्ये गेली येथे शाहू मिल वसाहत परिसरातील भक्तांकडून पालखीचे पूजन झाले लवाजम्यातील मानकऱ्यांनी लिंबू सरबत दिले. तशी पालखी पुढे मार्गस्त झाली. 

त्र्यंबोली टेकडीवर छत्रपतींच्या घराण्यातील मानकरी उपस्थिती झाले. त्यानुसार खासदार संभाजीराजे छत्रपती व मालोजीराजे, यवराज शहाजी राजे व यवराज यशराज राजे यांच्या उपस्थितीत त्र्यंबोली मंदिराच्या गाभाऱ्यात कोहाळ पूजन झाले त्यानंतर परंपरागत पुजाऱ्यांनी त्र्यंबोली देवीच्या प्रतिकात्मक रूपातील गौरी या बालिकेला कोहाळ विधीसाठी गाभाऱ्यात आणले. या बालिकेच्या हस्ते कोल्हासूराचा (कोहाळ) वध हा विधी होताच गाभाऱ्याच्या अवतीभवती थांबलेल्या भाविकांनी कोहाळ्यांची शकलं गोळा करण्यासाठी एकमेकांच्या अंगावर उड्या घेतल्या, एकमेकांना रेटत, ढकलत झुंबड उडाली. अवघ्या पाच दहा मिनिटातच काही शकलं गाभाऱ्याच्या अवतीभवती विखुरली गेली. तशी विखुरलेली शकलं ज्यांच्या हाती मिळाली त्याच्या हातातून हिसकावण्यासाठी एकावेळी दहाजण झटू लागले. जवळपास वीस मिनिटे टेकडीवर असा थरार सुरू होता. 

पालखी मार्गावर रांगोळी 
पालखी सोहळ्याचे ठिकाणी पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले तर सौभाग्यवतींनी पालखी सोहळ्याला पाणी वाहत, कुंकुमार्चन केले देवीच्या दर्शनाने कृतार्थतेचा भाव व्यक्त केला. पालखी मिरवणूक मार्गावर ठिकाणी गालीचा रांगोळी, काढण्यासाठी महिला युवतींची लगबग सकाळपासून सुरू होती अनेक ठिकाणी संस्कार भारती, फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या. 

मोफत आरोग्य शिबीर 
रोटरी क्‍लब ऑफ शिरोली एमआयडीसी यांच्यावतीने त्र्यंबोली टेकडीवर मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले यात अनेक भाविकांनी रक्तदाब व ऐनवेळी उद्भवलेल्या दुखण्यावर उपचारकरून घेतले. यात जवळपास 70 हून अधिक लोकांनी उपचाराचा लाभ घेतला 

कोल्हासूराचे प्रतिक कोहाळ 
यात्रेतील विधीसाठी दरवर्षी कोहळ आणले जाते यंदा मात्र कोहाळाला कोल्हासूराच्या रूपाचा आकार देण्यात आला होता अशी प्रतिकात्मक रूपातील कोहाळ पूजा व वध विधीसाठी वापरला गेला. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com