‘समभाव’ महोत्सव सहा फेब्रुवारीपासून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

कोल्हापूर - ‘मावा’, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी, महिला दक्षता समिती यांच्यातर्फे व न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने ६ ते ८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ‘समभाव’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे.

कोल्हापूर - ‘मावा’, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी, महिला दक्षता समिती यांच्यातर्फे व न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने ६ ते ८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ‘समभाव’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. ‘समभाव’ महोत्सवात केवळ स्त्री किंवा पुरुष म्हणून जगण्याची पारंपरिक चौकट मोडून जगणाऱ्या माणसांनाही सन्मानाने व सुरक्षितपणे जगता यावे, या दृष्टीने लिंगभेद व पुरुषत्वाबाबतच्या चुकीच्या कल्पना, समलिंगी व्यक्‍ती व त्यांचे जीवन, तृतीयपंथी व त्यांचे जीवन याच्याशी निगडित विविध पैलूंवरील १६ माहितीपट व चित्रपटप्रदर्शित केले जाणार आहेत.

‘मेन अगेन्स्ट व्हायोलन्स ॲण्ड ॲब्यूज’ ही स्त्री-पुरुष समानतेसाठी गेली २५ वर्षे कार्यरत असणारी संस्था. या संस्थेने  फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या संयुक्‍त सहकार्याने देशामध्ये दिल्ली, बंगळुरु, त्रिचूर, कोलकता, जळगाव आदी ठिकाणी दोन दिवसांचा हा महोत्सव भरवला. आता कोल्हापुरात ‘मावा’ म्हणजे ‘मेन अगेन्स्ट व्हायोलन्स ॲन्ड ॲब्यूज’, तसेच ‘एफटीआयआय’च्या साथीने व ‘कॅनडा फंड फॉर लोकल इनिशिएटिव्हज, तसेच महिला दक्षता समिती व न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने ‘समभाव चित्रपट महोत्सव’ घेतला जात आहे.

लिंगभेद, पौरुषत्वाबद्दलच्या चुकीच्या कल्पना, समाजात असणारी लैंगिक विविधता यांबाबत यथायोग्य जाणीव निर्मिती करण्यासाठीच्या या महोत्सवामध्ये फिल्म सोसायटीच्या सदस्यांबरोबरच महाविद्यालयीन सज्ञान विद्यार्थी-विद्यार्थिनी, सामाजिक कार्यकर्ते, तरुण सिनेनिर्माते या सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. नेहमी ज्या विषयांवर समाजात मोकळेपणाने चर्चा होत नाहीत अशा विषयांवर चित्रपट किंवा माहितीपट पाहिल्यानंतर होणारी चर्चा हे या महोत्सवाचे वेगळे वैशिष्ट्य असणार आहे. न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी सभागृहात तीन दिवस या महोत्सवातील लघुपट व चित्रपट दाखवून त्यावर तज्ज्ञांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे.

Web Title: Kolhapur News Sambhav Festival