नेटकं अन्‌ दिमाखदार ‘अग्निपंख’

संभाजी गंडमाळे
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

जातिव्यवस्था ही भारतीय समाजाच्या नसानसांत भिणलेली गोष्ट. अर्थातच ती नाटकाचा प्रमुख विषय बनली, यात नवल ते कसले ? समाजातील कोणताही घटक किंबहुना जातीला स्वतःची एक अस्मिता आहे आणि ती प्रत्येक समूहाने जपण्याचा प्रयत्न केला आहेच; मात्र,बदलांना सामोरे जाताना काही गोष्टी एकूणच समाजाला आत्मसात कराव्या लागल्या, हे वास्तव आहे.

जातिव्यवस्था ही भारतीय समाजाच्या नसानसांत भिणलेली गोष्ट. अर्थातच ती नाटकाचा प्रमुख विषय बनली, यात नवल ते कसले ?  समाजातील कोणताही घटक किंबहुना जातीला स्वतःची एक अस्मिता आहे आणि ती प्रत्येक समूहाने जपण्याचा प्रयत्न केला आहेच; मात्र,बदलांना सामोरे जाताना काही गोष्टी एकूणच समाजाला आत्मसात कराव्या लागल्या, हे वास्तव आहे.

भारतीय स्वातंत्र्यानंतरचा आणि विशेषतः राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या हत्येच्या पार्श्‍वभूमीवर प्रसिध्द नाटककार प्र. ल. मयेकर यांनी लिहिलेलं ‘अग्निपंख’ ही वैचारिक आणि आनंददायी शोकात्मिका सोमवारी सुगुण नाट्य संस्थेने स्पर्धेत सादर केली. अर्थात या नेटक्‍या आणि दिमाखदार प्रयोगाने यंदाची स्पर्धा अधिक कसदारच होणार, याची चाहूलही दिली.

खर तर ‘अग्निपंख’ हे मयेकरांचं पहिलं व्यावसायिक नाटक. १९८० साली राज्य नाट्य स्पर्धेत त्यांचं ‘आतंक’ हे नाटक सादर केलं होतं. हा प्रयोग डॉ. श्रीराम लागू यांनी पाहिला होता आणि त्याचं कौतुकही केलं होतं. कुमार सोहोनी यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. पुढे ‘अग्निपंख’ करताना कुमार सोहोनी यांनी डॉ. लागूंनाच विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली. डॉ. लागू आणि सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका. त्यांच्याबरोबर अरूण नलावडे यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं ते याच नाटकातून. या नाटकाचे पुढे हिंदातही प्रयोग झाले; मात्र राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्तानं ‘सुगुण’च्या टीमनं त्याची देखणी अनुभुती कोल्हापूरकरांना दिली. वैशाली घोरपडे यांनी ‘बाईसाहेब’ आणि महेश भूतकर यांनी ‘रावसाहेब’ अतिशय समर्थपणे पेलले. मजीब मुल्ला (रघु), शेखर बारटक्के (यशवंत), मंजित माने (राजशेखर), अनुजा घोरपडे (सुनिता), याज्ञसेनी घोरपडे (इंदिरा) यांच्या भूमिकाही चांगल्या. या नाटकाची सर्वात जमेची बाजू म्हणजे नेपथ्य आणि ध्वनी-प्रकाशाचा सुंदर मेळ. सार्थक बगाडे, पार्थ घोरपडे, विकास गुळवणी, राजेश शिंदे यांच्यासह ‘बॅकस्टेज’ने आपापल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या.

४० सेकंदात बदलायची होती साडी
आठ मार्च १९८६ ला या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत शिवाजी मंदिरला झाला. कुमार सोहोनी यांचं दिग्दर्शक म्हणून हे पहिलंच मोठं नाटक. डॉ. श्रीराम लागू, सुहास जोशी यांच्या त्यात प्रमूख भुमिका. बाईसाहेबांची या नाटकातली मध्यवर्ती भूमिका. एका प्रसंगात त्यांना चाळीस सेकंदात साडी बदलून पुन्हा रंगमंचावर एंट्री घेणं आवश्‍यक होतं; मात्र प्रत्यक्ष सराव तालमीवेळी त्यांना हे टायमिंग साधणं जमलं नव्हतं. पहिल्या प्रयोगावेळी मात्र सुहास जोशी यांनी अगदी ठरवून हे टायमिंग कुठल्याही परिस्थितीत साधायचंच, असं ठरवलं आणि एका मदतनीसाच्या सहाय्यानं ते शक्‍यही करून दाखवलं. मूळ नाटकात मयेकरांनी शेवट वेगळ्या पध्दतीनं लिहिला होता; मात्र डॉ. लागू यांनी तालमीवेळी त्यात थोडेसे बदल केले आणि शेवटही सर्वांनाच अंतर्मुख करणारा ठरला.
- श्रीराम खाडिलकर, समीक्षक, मुंबई

Web Title: Kolhapur News State Drama Competition special