असा वाढदिवस तुम्ही पाहिलाय का कधी? (व्हिडिओ) 

अण्णा काळे
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

- 101 व्या वर्षाच्या आजींचा वाढदिवस

- वाढदिवसानिमित्त सर्व कुटुंब तर एकत्र आलंच, शिवाय परिसरातील नागरिक सुद्धा

करमाळा (सोलापूर) : लहान मुलांचे, नेतमंडळींचे धुमधडाक्‍यातील वाढदिवस आपण नेहमी पाहतो. पण 101 व्या वर्षाच्या आजींचा वाढदिवस पाहिलाय का? हा वाढदिवस उस्मानाबाद जिल्ह्यातील ताकविकी येथे नातवंडांनी साजरा केलाय. या वाढदिवसानिमित्त सर्व कुटुंब तर एकत्र आलंच, शिवाय परिसरातील नागरिक सुद्धा हा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्साहाने सहभागी झाले. यशोदा कोंडिबा तरंगे या आजींचा तो वाढदिवस होता. 

लता मंगेशकर यांच्या प्रकृतिस्वास्थासाठी 'येथे' झाली महाआरती

आजींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दारात मंडप दिला. केक कापण्यासाठी डेकोरेशनही केले होते. यशोदा आजींना चार मुले व एक मुलगी आहे. वाढदिवसानिमित्त चार मुले, मुलगी, दोन भाऊ, सुना, 18 नातवंडे, 27 परतवंडे यांच्यासह जावई व नातजावई उपस्थित होते. यशोदा यांच्या पतीचे पाच वर्षापुर्वी निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय 110 वर्ष होते. यावर्षी दिवाळीतच वाढदिवस आल्याने उत्साहात भर पडली. मोहोळ (जि. सोलापूर) येथील उद्योगपती चंद्रकांत वाघमोडे हे त्यांचे नातजावई आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.

राष्ट्रपती राजवट म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्रात यापूर्वीही राजवट 

यशोदा यांचा 1918 मध्ये तोंरबा (जि. उस्मानाबाद) येथे जन्म झाला. त्यांची घरची परिस्थिती हालाकीची होती. निजामशाहीचा हा भाग असल्याने मोठा संघर्ष या भागातील नागरिकांच्या जीवनात होता. तसाच संघर्ष तरंगे कुठुंबालाही करावा लागला. शाहाजी तरंगे, माणिक तरंगे, श्रीधर तरंगे, बंजरंग तरंगे ही त्यांची मुले. गोदाबाई ही त्यांची एकुलती एक लेक. त्यांच्या हास्ते केक कापून हा वाढदिवस साजरा झाला. आण्णासाहेब तरंगे, विठ्ठल तरंगे, पांडु तरंगे, शिवाजी तरंगे, विश्वास तरंगे या नातवांडांनी हा वाढदिवस साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले. 

सकाळपासून घरात एवढी गर्दी पाहून मला काही समजत नव्हते. आज सगळेच कसे काय एकत्र आलेत हे कळेनाच. माझ्या नातींनी नवी साडी नेसवली आणि सांगितलं, आजी तुझा आज वाढदिवस साजरा करायचा आहे. मला काय कळनाच? खूप कष्टातून संसार केला आज सगळे सुखात आहेत हे पाहून समाधान वाटले. 
- यशोदा कोडिंबा तरंगे, आजी, ताकविकी 

आजीचा वाढदिवस साजरा करताना घरातील सगळ्यांनाच खूप आनंद झाला. आमची 101 व्या वर्षी आजी व्यवस्थित आहे. यांचे आम्हाला निश्‍चितच समाधान आहे. आम्ही सर्व भावांनी विचार करून वाढदिवस साजरा करायचा ठरवले. त्यामुळे सर्व नातेवाईक एकत्र आले आहेत. 
- विठ्ठल तरंगे, ताकविकी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Have you ever seen a birthday like this? (Video)