सलून, पार्लर सुरू होणार पण...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

सलून व पार्लर सुरू करण्याची परवानगी आहे पण....

बेळगाव  : हेअर कटिंग सलून व पार्लर सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यासाठी तब्बल १४ अटी घातल्या आहेत. या अटींचे काटेकोर पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे. २२ मार्चपासून बेळगाव शहरासह राज्यातील सर्व सलून व पार्लर बंद आहेत. राज्यशासनाने लॉकडाऊन शिथिल करताना सलून व पार्लर सुरू करण्याची परवानगी दिली. पण १४ अटींचे पालन करून सलून व पार्लर चालविणे शक्य आहे का? असा सवाल आहे.

राज्याच्या आरोग्य व कुटुंबकल्याण खात्याच्या परिपत्रकानुसार ताप सर्दी, खोकला, घसादुखी असणाऱ्यांना सलून व पार्लर मध्ये प्रवेश देता येणार नाही. सलून व पार्लर मालक, तेथील कर्मचारी तसेच ग्राहकांनाही मास्क वापरणे सक्तीचे आहे. प्रत्येक सलून व पार्लरच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायजर उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. ग्राहकासाठी कापडी टॉवेल वापरण्यावर बंदी आहे.  डिस्पोजेबल टॉवेल किंवा कागदाचा वापर करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. सलून व पार्लरमधील उपकरणांचे सातत्याने निर्जंतुकीकरण करण्याची सक्ती आहे. निर्जंतुकीकरण केल्यानंतर ३० मिनिटे त्या उपकरणाचा वापर करू नये असे सांगितले आहे. यासाठी उपकरणांचे पर्यायी जोड उपलब्ध करण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा- ब्रेकिंग - कोल्हापुरात कोरोनाचे दीड शतक पार, आणखी  19 जण पाॅझिटिव्ह

अशा आहेत अटीं

सलून व पार्लरमधील कर्मचाऱ्यांना सातत्याने हातांचे निर्जंतुकीकरण करण्यास सांगण्यात आले आहे. ग्राहकांना आगाऊ नोंदणी किंवा टोकनच्या माध्यमातून प्रवेश घेण्याची सक्ती करावी अशी सूचना देण्यात आली आहे. ग्राहकांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देणे, शारीरिक अंतर ठेवण्याची सक्ती करण्याची सूचना देण्यात आली आहे. सलून व पार्लरमधील कार्पेट व फारशी यांचे नियमित निर्जंतुकीकरण करण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा- हाॅटेल व्यवसायिकांनी सरकारकडे केलीय ही मागणी

सलून व पार्लरमधील ब्लेड व अन्य साहित्य कोठेही टाकण्याची मुभा नाही. ते सर्व साहित्य योग्य पद्धतीने साठवून ठेवणे व वैद्यकीय कचऱ्याची जेथे विल्हेवाट लावली जाते तेथे पाठविण्याची सक्ती करण्यात आली आहे. कोरोनाबाबत फलक लावून जागृती करणे, कर्मचाऱ्यांपैकी कोणामध्ये लक्षणे आढळली तर त्याना तातडीने फ्लू क्लिनिकमध्ये पाठवून उपचार देण्यास सांगण्यात आले आहे. या सर्व नियम व अटींचे पालन होते की नाही यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाला लक्ष्य ठेवावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The government gave permission to start hair cutting salon and parlour