कोल्हापूरच्या सीपीआरमधील 50 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव

0
0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर सीपीआरमधील 50 टक्के बेड व उपचारपूरक सुविधा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी रात्री  दिले. 

बाधितांची संख्या आणखी वाढल्यास उपचारांबाबत गैरसोय होऊ नये, यासाठी खबरदारीचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सीपीआरमध्ये येणारे अन्य बाह्यरुग्ण कसबाबावडा येथील सेवा रुग्णालयात पाठवले जातील. सीपीआरमधील आंतररुग्ण खासगी रुग्णालयांकडे पाठवण्यात येतील. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा आणि बाह्य रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये उपचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी, असेही आदेशात म्हटले आहे. 
दिवसात बाधितांचे द्विशतक 

मंगळवारी सहा व्यक्‍तींचा मृत्यू; 231 नवे कोरोनाबाधित 

कोल्हापूर जिल्हाभरात मंगळवारी कोरोनाचा कहर झाला. दिवसभरात 231 नवे बाधित आढळले. त्यात शहरी भागातील 114 जण आहेत. जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या एक हजार 269 झाली. त्यातील 84 व्यक्ती गंभीर आहेत. 70 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. सहा व्यक्तींचा मृत्यू झाला. 

दीड महिन्यापासून बाधितांची संख्या दिवसागणिक वाढती आहे. नव्या बाधिताच्या संपर्कातील किमान 20 व्यक्तींची कोरोना तपासणी होत आहे. त्यानुसार स्वॅब संकलन वाढले. महिनाभरात दिवसाला सरासरी 800 स्वॅब संकलन होते. आज शहरात 900 हून अधिक, तर जिल्हाभरात 350 असे एकूण 1200 हून अधिक स्वॅब तपासणीसाठी आले. 

शिये (ता. करवीर) येथील 65 वर्षीय महिला, शहरातील नागाळा पार्कातील 72 वर्षीय पुरुष, तर नागाव (ता. हातकणंगले) येथील 72 वर्षीय महिला, सम्राटनगरातील 85 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 36 वर्षीय महिला, संभाजीनगर येथील 95 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यातील पहिल्या तिघांचा "सीपीआर'मध्ये, तर उर्वरितांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या सर्वांना फुफ्फुसाचा संसर्ग, न्यूमोनिया, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आदी विकार होते. 

दिवसभरात आढळलेले रुग्ण
भुदरगड 1, गडहिंग्लज 3, हातकणंगले 12, कागल 8, करवीर 20, पन्हाळा 3, राधानगरी 1, शाहूवाडी 5, शिरोळ 6, पालिका 32, कोल्हापूर शहर 134, परजिल्ह्यातील 26. 

       कोल्हापूर जिल्ह्याची स्थिती 

  • एकूण कोरोनाबाधित : 52 हजार 985 
  • कोरोनामुक्त : 49 हजार 922 
  • कोरोना मृत्यू : 1 हजार 794 
  • सक्रिय रुग्ण : 1 हजार 269 


संपादन : विजय वेदपाठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com