‘त्या’ नेपाळी बाबूंना अखेर काढले शोधून....

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 23 मार्च 2020

नेपाळी व्यक्ती तावडे हॉटेलमार्गे शहरात शिरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अथक प्रयत्नानंतर रुईकर कॉलनीत तो सापडला.

कोल्हापूर : नेपाळी व्यक्ती तावडे हॉटेलमार्गे शहरात शिरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अथक प्रयत्नानंतर रुईकर कॉलनीत तो सापडला. गोवा, मुंबईमार्गे तो शहरात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. तसा साऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. 

तावडे हॉटेलमार्गे नेपाळी व्यक्ती शहरात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली. नेमकी ती व्यक्ती कोण, शहरात कर्फ्यू असताना कशी आली, असा प्रश्‍न पोलिसांना पडला. तसा त्यांनी त्याचा शोध सुरू केला. शहरातील तपासणी नाके, चौकात गस्त घालणाऱ्या पोलिसांना याची माहिती दिली. दुपारी साडेबाराच्या सुमारास रुईकर कॉलनी येथे गस्त घालणाऱ्या वाहतूक पोलिस संतोष कांबळे यांना रस्त्याकडेला रोपे विक्री करणाऱ्या एकाकडे त्याने आश्रय घेतल्याचे समजले.

हेही वाचा- बंद म्हणजे बंद : काय राहणार सुरु आणि काय बंद वाचा...

घटनास्थळी जाऊन त्यांनी त्याची खात्री केली. यानंतर त्यांनी आरोग्य विभागाला तेथे बोलवून घेतले. त्यानुसार मध्यवर्ती बस स्थानक येथील सावित्रीबाई हॉस्पिटल येथील डॉ. आदित्य कुमार, डॉ. हिना शेख आणि डॉ. सुप्रिया सरनाईक यांनी घटनास्थळी जाऊन त्याची माहिती घेतली. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून तपासणीसाठी सीपीआरमध्ये दाखल केले.

 हेही वाचा-कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या मनाई आदेशाचा त्यांनी केला भंग अन्....
प्राथमिक चौकशीत नेपाळी व्यक्ती यापूर्वी गोवा येथे नोकरीस होती; पण तेथील काम बंद झाले. रोजगारासाठी ती मुंबईला गेली होती, मात्र तेथेही काम न मिळाल्याने ती व्यक्ती ट्रकचा आधार घेत तावडे हॉटेल येथे आज सकाळी उतरली. त्यानंतर ती शिरोली टोलनाक्‍यावरून पोलिसांची नजर चुकवून ती रुईकर कॉलनीपर्यंत पोहचल्याचे पुढे आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After finding out that Nepali Babu was finally removed kolhapur marathi news