आता क्रिकेटची फायनल जिंकल्यावर मिळणार नाही ट्रॉफी, तर बक्षीस म्हणून मिळणार बोकड, कोंबड्या!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 December 2020

क्रिकेटप्रेमी साळगाव यांच्यातर्फे आजपासून ओपन हाफ- पीच क्रिकेट स्पर्धे (अन्डर आर्म) ला सुरवात झाली आहे.

आजरा (कोल्हापूर) :  ट्रॉफी..... फिरता चषक अशा प्रकारची विविध बक्षिसांची खैरात आजपर्यंत ग्रामीण भागातील क्रिकेट स्पर्धेत दिली जात असे. आता तर चक्क बक्षीस म्हणून बोकड व कोंबड्या दिल्या जाणार आहेत. साळगाव (ता. आजरा) येथे आजपासून सुरू झालेल्या क्रिकेट स्पर्धेत बक्षिसांच्या यादीकडे लक्ष दिल्यास विजेत्यांना बोकड व कोंबड्या दिल्या जाणार आहेत. तालुक्‍यात प्रथमच अशा प्रकारची बक्षिसे दिली जाणार असल्याने तालुक्‍यातील क्रीडा वर्तुळात सध्या चर्चेचा विषय आहे.

क्रिकेटप्रेमी साळगाव यांच्यातर्फे आजपासून ओपन हाफ- पीच क्रिकेट स्पर्धे (अन्डर आर्म) ला सुरवात झाली आहे. या स्पर्धेसाठी संयोजकांनी आकर्षक बक्षिसे जाहीर केली आहेत. आकर्षक बक्षीस म्हटल्यावर अनेकांचे बक्षिसांकडे लक्ष वेधते; पण ही बक्षिसे बोकड व कोंबड्या आहेत. प्रथम क्रमांक विजेत्याला एक बोकड व चषक दिला जाणार आहे.

हेही वाचा- शिवसेना-भाजपमधील संघर्षामुळे लढती लक्षवेधी -

द्वितीय क्रमांकाला गावठी कोंबड्याचे आठ नग व चषक, तर तृतीय क्रमांकाला गावठी कोंबड्याचे सहा नग व चषक दिला जाईल. चतुर्थ क्रमांकाला केवळ चषक दिला जाणार आहे. आगळ्या वेगळ्या बक्षिसामुळे क्रिकेटप्रेमींचे या स्पर्धेकडे लक्ष लागून राहिले आहे. कोकणामध्ये क्रिकेट स्पर्धेत अशा प्रकारची बक्षिसे विजेत्यांना दिली जातात; पण या तालुक्‍यात प्रथमच अशा प्रकारची बक्षिसे दिली जात आहे. 

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After winning the cricket final prize trophy get a goat