आजरा साखर कारखाना सुरू करण्यासाठी कामगारांची पगार कपातीला दर्शवली सहमती

aajra karkhana.jpg1_.png
aajra karkhana.jpg1_.png

आजरा, कोल्हापूर ः आजरा कारखाना खासगीकरणातून चालवण्यासाठी जिल्हा बॅंकेने दोन वेळा निविदा प्रसिद्ध करून ही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे कारखाना यंदा सुरू होण्याबाबत प्रश्‍नचिन्ह तयार झाले आहे, अशा वेळी कामगारांनी कारखाना यंदा सुरू होण्यासाठी दोन पावले पुढे येत पगार कपातीला सहमती दर्शवली असून, संमतीचे पत्र कारखाना व्यवस्थापनाला दिले आहे. त्याचबरोबर जिल्हा पातळीबरोबर तालुक्‍यातील नेतेमंडळींकडून कारखान्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. 
कारखान्यासाठी पुणे येथील कंपनीने एकमेव निविदा भरली होती, पण संबंधित कंपनीकडून कारखाना चालवण्याबाबत पुरेशी सक्षमता दाखवली गेली नसल्याने ही निविदा जिल्हा बॅंकेच्या व्यवस्थापनाने नामंजूर केली. शुक्रवारी (ता.25) याबाबत झालेल्या व्यवस्थापनाच्या बैठकीत आजराबाबतचा निर्णय बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ, संचालक पी. एन. पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर व राजेश पाटील या चौघांकडे सोपवला आहे. लवकरच याबाबत चर्चा होऊन आजऱ्याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 
दरम्यान, रविवार (ता. 27) कारखाना स्थळावर कामगार प्रतिनिधी, कामगार यांच्यासमवेत कारखाना अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांची बैठक झाली. कारखाना चालवण्यास देण्याबाबतच्या घडामोडीवर बैठकीत चर्चा झाली. या वेळी काही आर्थिक निर्णय ठामपणे घ्यावे लागतील, असे प्रा. शिंत्रे यांनी सांगितले. कामगार प्रतिनिधींनी कारखाना सुरू होत असेल, तर पगार कपातीला आमची तयारी असल्याचे सांगितले. आजरा साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष धनाजी किल्लेदार, उपाध्यक्ष संजय उत्तूरकर, जनरल सेक्रेटरी रमेश देसाई व सदस्यांसह या वेळी प्रभारी कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. 


थकहमीसाठी निकराचे प्रयत्न 
कारखाना व्यवस्थापनाकडून थकहमी मिळावी, यासाठी व्यवस्थापनाकडून निकराचे प्रयत्न सुरू आहेत. थकहमीबाबतचा प्रस्ताव साखर आयुक्तांकडे दिला आहे. जिल्हा बॅंकेने यासाठी नाहरकत पत्र दिल्याशिवाय थकहमी मिळणार नसल्याचे समजते. 

जिल्हा बॅंकेला 45 कोटींचा प्रस्ताव 
आजरा कारखाना व्यवस्थापनाकडून जिल्हा बॅंकेला चालू हंगामासाठी व गत हंगामातील देणी देण्याकरिता पूर्व हंगाम व आत्मनिर्भर योजनेंतर्गत 45 कोटी कर्ज उपलब्ध होण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. कारखाना चालवण्याबाबतच्या नियोजनाचा आराखडाही दिला आहे. 

- संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com