कोल्हापूर महापालिकेच्या चौकशी समितीने घरफाळा घोटाळ्याचा अहवाल बदलल्याचा आरोप

डॅनिअल काळे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

भूपाल शेटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संजय भोसले यांनी ज्या 14 प्रकरणांमध्ये 3 कोटी 18 लाख 1 हजार 291 रुपयांचा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे, पण ही माहिती त्यांनी चुकीची व बोगस काढलेली आहे. या रक्कमेमध्ये आणखीन 1 ते 1.50 कोटींच्या पुढे वाढ होणार आहे. ती माहिती त्यांनी आयुक्तांपासून लपविली आहे.

कोल्हापूर ः महापालिकेतील घरफाळा घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या समितीच्या अहवालात करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले यांना वाचविण्यासाठी हा अहवालच बदलल्याचा आरोप करत नगरसेवक भूपाल शेटे यांनी स्थायी समितीमध्ये याबाबतचे पुरावे सादर केल्याचा दावा केला आहे. संबंधितावर फौजदारी करा, घरफाळ्याची सर्व कागदपत्रे ताब्यात घ्या, अशी मागणीही त्यांनी या सभेत केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संदीप कवाळे होते. 
भूपाल शेटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संजय भोसले यांनी ज्या 14 प्रकरणांमध्ये 3 कोटी 18 लाख 1 हजार 291 रुपयांचा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे, पण ही माहिती त्यांनी चुकीची व बोगस काढलेली आहे. या रक्कमेमध्ये आणखीन 1 ते 1.50 कोटींच्या पुढे वाढ होणार आहे. ती माहिती त्यांनी आयुक्तांपासून लपविली आहे. घरफाळा चौकशी समितीने आपल्या अहवालात या 14 प्रकरणामध्ये 1 एप्रिल 2003 पासून ते 31मार्च 2020 पर्यंत कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. असे असताना संजय भोसले कर अधीक्षक म्हणून 28जुलै 2009 ते 1फेब्रुवारी 2011 व कर निर्धारक व संग्राहक म्हणून 1 फेब्रुवारी 2011 ते 19 फेब्रुवारी 2013 पर्यंत पदावर असताना घरफाळा फरकाची व दंडाची रक्कम त्यांच्यावर येते. पण त्यांनी ती सर्व रक्कम या चार कर्मचारी यांच्यावर दाखवून दोषी ठरविले आहे. परंतु यातून आपला कार्यकाळ मात्र वगळलेला आहे. 
घरफाळा चौकशी समितीने अंतिम केलेल्या अहवालातील दोन मिळकतधारक व संजय भोसले हे दोषी ठरतात, म्हणून दोन पाने बदलून नवीन अहवाल दिला आहे. हा अहवाल मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे यांच्या ऑफिसमध्ये सुहास बंडू चिक्के कनिष्ठ लिपिक, मुख्य लेखापरीक्षक ऑफिस यांनी संगणकामध्ये तयार केलेला आहे. पण या कर्मचाऱ्यावर त्यामधून आपले नाव काढावे म्हणून चौकशी समितीमधील अधिकारी व संजय भोसले हे दबाव टाकत आहेत. तरी आयुक्तांनी हा संगणक ताबडतोब जप्त करून सील करावा, अशी शेटे यांची मागणी आहे. 
14 प्रकरणांमधील आणखी 2 प्रकरणामध्ये दिवाकर कारंडे, संजय भोसले व कर अधीक्षक अनिरूध्द शेटे, दिलीप कोळी (निवृत्त कर अधीक्षक) हे दोषी ठरतात. पण, त्या मिळकत धारकावरही कारवाई करावी लागते. त्यांना क्‍लिन चिट देण्यासाठी या प्रकरणात कारवाई झाली नाही,असे ही निवेदनात म्हटले आहे.

भोसलेंचे आव्हान स्वीकारले 
संजय भोसले यांनी मला या घरफाळा प्रकरणात कारवाई करण्याचे जे आव्हान दिले होते. ते आव्हान मी स्वीकारले असून संजय भोसले यांनी कोणत्याही परीस्थिती माझ्यावर कारवाई करावी. मी तर या प्रकरणात आयुक्त व चौकशी समितीचे सर्व सदस्य तसेच संजय भोसले यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. तसेच जिल्हा न्यायालय येथे फौजदारी दाखल करणार आहे, असे ही शेटे यांनी सांगितले. 

 

संपादन ः यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allegation that the inquiry committee of Kolhapur Municipal Corporation changed the report of the house tax scam