
डॉ. विश्वजित खोत यांचे संशोधन; केमोथेरपीत नॅनो पार्टिकल्स वापर करून उपचार
कोल्हापूर : जगभरात कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारपद्धतीबाबत संशोधन होत आहे. यात केमोथेरपी आणि सर्जरीला पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या उपचार पद्धतींचा समावेश आहे. अशाच पद्धतीच्या साईड इफेक्ट कमी करणाऱ्या ‘मॅग्नेटिक नॅनो पार्टिकल फॉर डायग्नोसिस ॲण्ड थेरपी ऑफ कॅन्सर’ या विषयावर कोल्हापुरातील डॉ. विश्वजित महिपती खोत यांनी संशोधन केले आहे. सध्या प्रचलित असलेल्या केमोथेरपीत कर्करोगाच्या पेशीसोबत शरीरातील इतर अवयवांवर परिणाम होऊन रुग्णांना अधिक त्रासाला सामोरे जावे लागते. डॉ. खोत यांनी संशोधन केलेल्या थेरपीत शरीरातील कर्करोगाच्या पेशींना ‘लक्ष्य’ करून नॅनो पार्टिकल्सचा वापर करून उपचार केले जाणार आहेत.
‘मॅग्नेटिक नॅनो पार्टिकल फॉर डायग्नोसिस ॲण्ड थेरपी ऑफ कॅन्सर’ या विषयावरील संशोधनात त्यांनी एमआरआयचा वापर करून रुग्णांना दिलेल्या औषधांचा शरीरातील नेमक्या कर्करोगाच्या पेशींवरच उपचार केला जाणार आहे. त्यांच्या संशोधनामुळे कर्करोगावरील उपचार पद्धती नेमकी व सुटसुटीत होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा- राजकारणातील अनुकंपा तत्त्वावर जयंतरावांना मिळाली राजकीय संधी
डॉ. खोत मूळचे इचलकरंजीचे. दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिवाजी विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयातून त्यांनी एमएस्सीचे शिक्षण घेतले. त्यानंतर डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात त्यांनी ‘मॅग्नेटिक नॅनो पार्टिकल फॉर डायग्नोसिस ॲण्ड थेरपी ऑफ कॅन्सर’ या विषयात संशोधन सुरू केले व पीएच.डी. संपादन केली. त्यांना कौन्सिल ऑफ सायंटिसिक ॲण्ड इंडस्ट्रियल रिसर्चकडून सीनिअर रिसर्च फेलोशिप मिळाली. त्यांना या संशोधनामुळे २०१५ साली युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन व रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ग्रेट ब्रिटन येथे पोस्ट डॉक्टरल रिसर्च असोसिएटस् म्हणून संशोधनाची संधी मिळाली. सध्या युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डसोबत याच विषयातील त्यांचे संशोधन अंतिम टप्प्यात आले आहे.
संपादन- अर्चना बनगे