भाविकांसाठी खुशखबर! अंबाबाई, जोतिबा मंदिरे आता आठ तास खुली, मोफत ई-पास उपलब्ध 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

सायंकाळच्या सत्रात मात्र पूर्वीप्रमाणेच चार ते सात या वेळेत दर्शन मिळेल

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिरासह पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारितील सर्व मंदिरे आता दररोज आठ तास भाविकांना दर्शनासाठी खुली राहणार आहेत. सकाळच्या सत्रात दोन तासांनी वेळ वाढवली असून आता सकाळी सात ते दुपारी बारा या वेळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. 

सायंकाळच्या सत्रात मात्र पूर्वीप्रमाणेच चार ते सात या वेळेत दर्शन मिळेल. दरम्यान, याबाबतचा निर्णय आज देवस्थान समितीच्या बैठकीत घेण्यात आला. देशभरातील भाविकांना दर्शनासाठी मोफत ई-पासची सुविधाही आजपासून उपलब्ध झाली आहे. 

आठ महिन्यानंतर दिवाळी पाडव्यादिवशी मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली. मात्र, गेल्या आठवड्यात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेवूनच भाविकांना दर्शन दिले जात आहे. पहिल्या टप्प्यात सकाळच्या सत्रात नऊ ते दुपारी बारा या वेळेत भाविकांना दर्शन दिले गेले. आता ही वेळ दोन तासांनी वाढवण्यात आली आहे. त्याशिवाय देशभरातून येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, या उद्देशाने समितीच्या अधिकृत वेबसाईटवर मोफत ई-पासची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यासाठी संबंधित भाविकांना वेबसाईटवर जावून दर्शनासाठीचा फॉर्म भरावा लागेल.

हे पण वाचा शहीद जवान संग्राम पाटील यांचे स्वप्न अधुरे....

आवश्‍यक ती सर्व माहिती भरल्यानंतर संबंधित भाविकांना ई-पास दिला जाईल. अशा भाविकांसाठी ैमंदिरात दर्शनासाठी स्वतंत्र रांग केली जाणार असून जिल्ह्यातील भाविकांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी www.mahalaxmikolhapur.com या वेबसाईटवर फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. बैठकीला समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, अभियंता सुदेश देशपांडे आदी उपस्थित होते.
 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambabai Jotiba temples are now open for eight hours