
लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळालेच पाहिजे. पुनर्वसनचे काम पूर्ण न झालेने धरणग्रस्तांकडून घळ भरणीला विरोध होत आहे
कोल्हापूर - आंबेओहोळ धरणाच्या घळ भरणीचे काम सुरू आहे.गेली 21 वर्षे रेंगाळलेल्या या धरणात यावर्षी पाणी साठलेच पाहिजे असे आमचेही मत आहे. लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळालेच पाहिजे. पुनर्वसनचे काम पूर्ण न झालेने धरणग्रस्तांकडून घळ भरणीला विरोध होत आहे. त्यासाठी पुनर्वसनातील त्रुटी दूर करा, अशी मागणी आज भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.
जिल्हाधिकारी यांच्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,"गेली एकवीस वर्षे हा प्रकल्प रेंगाळला आहे. भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून व माझ्या पुढाकारातून 227 कोटी रुपयांचा निधी पुनर्वसनासाठी मंजूर करून आणला होता. मात्र इतका मोठा निधी आणून सुद्धा अजूनही पुनर्वसनाचे काम अपुरे आहे. त्यामुळे धरणग्रस्तांना विश्वासात न घेता सुरू असलेल्या घळभरणीच्या कामास ते विरोध करीत आहेत. एकदा धरणात पाणीसाठा झाला की भविष्यात आपला पुनर्वसनाचा प्रश्न सुटणार नाही. अशी त्यांच्या मनात भिती आहे. त्यामुळेच घळभरणीच्या कामास ते विरोध करीत आहेत.'
येत्या 31 मार्च अखेर त्यांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी पत्राद्वारे विनंती केली आहे. जिल्हाधिकारी यांनीही स्वतः जातीने लक्ष घालावे. अशी त्यांना भेटून विनंती केली. तसेच एकदा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यास धरणग्रस्त सुद्धा या धरणाच्या घळभरणीच्या कामासाठी मोठ्या मनाने सहकार्य करतील. या परिसराला वरदान ठरणाऱ्या या प्रकल्पातील पाण्याकडे येथील शेतकरी अनेक वर्षे डोळे लावून बसले आहेत. ज्यांनी जमिनी दिल्या आहेत. त्यांनी या पाण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे का? असा सवालही श्री. घाटगे यांनी यावेळी उपस्थित केला.
तर शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्णत्वास येईल
या धरणात पाणी साठा व्हावा. ते पाणी आपल्या शिवारात खेळावे. असे स्वप्न या परिसरातील शेतकरी मागील कित्येक वर्षे पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या जमिनी विस्थापित धरणग्रस्तांसाठी दिल्या आहेत. हे स्वप्न पुनर्वसनासाठीच्या निधीअभावी रखडले आहे. पुनर्वसन योग्य पद्धतीने केले असते तर घळभरणीचे कामाला विरोध झाला नसता. शिवाय या धरणात पाणी साठवण्याचे तमाम शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्णत्वास आले असते असेही श्री घाटगे म्हणाले.
संपादन - धनाजी सुर्वे