उमेदवारीवरून "स्वाभिमानी'त छुपा संघर्ष; कार्यकर्त्यांची घालमेल; शेट्टी-मादनाईक संवाद नाहीच 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

मादनाईक यांनी नाराज असल्याचे पुन्हा एकदा सांगत यापुढे संघटनेत जमेल तसे काम करण्याचे बोलून दाखविले. 

जयसिंगपूर - राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या उमेदवारीवरून "स्वाभिमानी'त अद्यापही चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. दरम्यान, आज जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सावकर मादनाईक यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मादनाईक यांनी नाराज असल्याचे पुन्हा एकदा सांगत यापुढे संघटनेत जमेल तसे काम करण्याचे बोलून दाखविले. 
राजू शेट्टी यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर स्वाभिमानीतील नाराजी उघड झाली. माझ्या नावाचा विचार व्हायला हवा होता; मात्र, राजू शेट्टी यांना माझ्या शुभेच्छा आहेत. यापुढेही संघटना अभेद्यच राहील; मात्र जमेल तसे काम करत राहू, असे सांगत नाराजीचेच संकेत दिले. माजी खासदार शेट्टी यांनी नात्यात अंतर पडत असेल, तर विधानपरिषदेचे ब्यादच नको असे सांगितले. यातही स्पष्टता नसल्याने कार्यकर्त्यांची घालमेल वाढली असताना शेट्टींना शुभेच्छा आहेत. जमेल तसे काम करत राहू, असे सांगून मतभेद अद्याप संपले नसल्याचे संकेत दिले. 

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आज मादनाईक यांच्या निवासस्थानासह पेट्रोल पंपावर गर्दी केली. सांगली जिल्ह्यातून महामार्ग बंदीमुळे अनेकांनी मोबाईलद्वारे मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, रात्री उशिरापर्यंत शेट्टी-मादनाईक यांच्यात वैयक्तिक संपर्क झाला नसल्याने सांगण्यात आले. 
विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून स्वाभिमानीत अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. लवकरच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून हा प्रश्‍न समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असून दोन दिवसांत वादावर पडदा पडेल असे एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

बोलते व्हा 
विधान परिषदेवरून शेट्टी-मादनाईक यांच्यात सुप्त वाद आहे. सोशल मीडियावरून व्हायरल होणारे संदेश मने दुखावण्यास कारणीभूत ठरत आहेत. अशात शेट्टी-मादनाईक यांच्या संवाद होण्याची गरज आहे. संवाद झाला तरच हा वाद संपणार आहे. अन्यथा खऱ्या अर्थाने दोन्ही नेत्यांमध्ये अंतर निर्माण होणार आहे. 

हे पण वाचा - अंजली-राणादा कोल्हापुरात पुन्हा करणार धमाल

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Argument continue in swabhimani shetkari sanghatana