कोल्हापुरच्या जनावरांवर होणार आयुर्वेदिक उपचार...

Ayurvedic treatment for animals in Kolhapur
Ayurvedic treatment for animals in Kolhapur

कोल्हापूर - जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दुभत्या जनावरांना होणाऱ्या साथीच्या तसेच इतर आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार सुरू केले आहेत. यासाठी ‘गोकुळ’ आणि बंगळूर येथील आयुर्वेदिक विद्यापीठ (दि युनिव्हर्सिटी ऑफ ट्रान्स-डिसिप्लीनरी हेल्थ सायन्सेस ॲण्ड टेक्‍नॉलॉजी)बरोबर करार केला आहे.  या करारांतर्गत  ‘गोकुळ’च्या  पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बंगळूर येथे प्रशिक्षण दिले आहे. सहकार डेअरीतील हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असल्याचा दावा संघाने केला आहे. 

 ६० पशुवैद्यकीय डॉक्‍टरांची फौज

दुभत्या जनावरांना आजार झाल्यास त्यांच्या उपचारांसाठी ‘गोकुळ’ने ६० पशुवैद्यकीय डॉक्‍टरांची फौज जिल्ह्यासाठी तैनात केली आहे. ग्रामीण भागातील जनावरांच्या कोणत्याही प्रकारच्या आजारासाठी गोठ्यात जाऊन उपचार आणि औषधेही देण्याची सोय केली आहे. 

आज माणसांच्या आजारपणावरील उपचारांसाठी निसर्गोपचार आणि आयुर्वेदाचा प्रसार होत आहे. त्याप्रमाणे जनावरांनाही आयुर्वेद उपचार पद्धती वापरली जात आहे.  ‘गोकुळ’ने पशुधनासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण जनावरांनी घेतलेल्या आहार आणि औषधांचा परिणाम त्यांच्या दुधावर होतो. जनावरांना दिलेल्या अँटिबायोटीक आणि इंग्रजी औषधांचे अवशेष काही अंशी दुधात उतरतात. त्याचे परिणाम मानवी शरीरावर होतात. परंतु, आयुर्वेदिक उपचार पद्धतीने जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि दुष्परिणाम होत नाहीत. पर्यायाने दुधात वाढ होते.  भविष्यात याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यासाठी ‘गोकुळ’च्या महिला नेतृत्व विकास कार्यक्रमातील महिला स्वयंसेविकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षित झालेल्या महिलांनी गावपातळीवरील महिला बचत गट आणि आहार संतुलन कार्यक्रमातील स्वयंसेविका आदींना प्रशिक्षित करून गावपातळीवरच औषध तयार करून जनावरांचे उपचारांचे उद्दिष्ट आहे. 

उपचारांसाठी सहज उपलब्ध होणाऱ्या वनस्पती
उपचारात अवतीभोवती सहज उपलब्ध असणारे कोरफड, तुळस, शेवगा, कडुलिंब, कढीपत्ता, मेंदी, वड, पिंपळ, उंबर आदी प्रकारच्या वनस्पती आणि  स्वयंपाकघरात  उपलब्ध असणारे गूळ, हळद, काळी मिरी, लसूण, कांदा, नारळ, चिंच, जिरे, धणे, हिंग, मेथी, वेलदोडा, दालचिनी, खडीसाखर, अशा वस्तूंचा वापर करण्यात येणार आहे. 

१७ ते १८ प्रकारच्या आजारांवर उपचार

जनावरांना होणाऱ्या लाळ खुरकत, स्तन ग्रंथीमधील सूज म्हणजे मस्टायसीस, आतड्याचा दाह अर्थात आंत्रशोय, स्तनशोय, गर्भाशय संक्रमण, तसेच आम्लपित्त, पोटातील वात, ताप, हगवण शरीरावरील जखमा अशा अंदाजे १७ ते १८  प्रकारच्या आजारांवर आता आयुर्वेदिक उपचार होणार आहेत.  

ग्राहक आणि उत्पादकांसाठी ‘गोकुळ’ने आधुनिक योजनांकरवी लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आयुर्वेद प्रथमोपचार म्हणून आणि नंतरही पशुधनाची काळजी घेणे शेतकऱ्यांना शक्‍य होईल. आणि जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने साथीच्या आजारांतही दुभती जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होणार आहे.  
- रवींद्र आपटे, अध्यक्ष, ‘गोकुळ’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com