बेळगावचा `युपीएससी`त झेंडा; तब्बल पाच जणांची यशाला गवसणी

belgaum district students success in upsc exam
belgaum district students success in upsc exam

बेळगाव - केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) २०१९ मध्ये घेतलेल्या परीक्षेत बेळगाव जिल्ह्याने यश संपादित केले आहे. जिल्ह्यातील पाच जण उत्तीर्ण झाले आहेत. जगदीश आडहळ्ळी (मोळे, ता. कागवाड), आनंद कलादगी (बेळगाव), प्रफुल्ल देसाई (यरनाळ, ता. हुक्केरी), गजानन बाले (कुडची, ता. रायबाग) आणि प्रियांका कांबळे (रा. चिक्कोडी, मूळगाव केस्ती-ता. हुक्केरी) अशी यशस्वीतांची नावे आहेत. 


जगदीश आडहळ्ळी यांनी देशात ४४० वा, आनंद कलादगी यांनी ४४६ वा, प्रफुल्ल देसाई यांनी ५३२ वा, गजानन शंकर बाले यांनी ६६३ वा तर प्रियांका विठ्ठल कांबळे यांनी ६७० वी रॅंक पटकाविली आहे. या सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थांनी आपली चमक दाखवित हे यश संपादन केले आहे. 

जगदीश आडहळ्ळी हे मोळेसारख्या ग्रामीण भागाती आहेत. त्यांची घरची परिस्थिती बेताची आहे. त्यांचे वडील श्रीकांत आडहळ्ळी हे ट्रॅक्टरचालक आहेत. 

आनंद कलादगी हे बेळगावातील जी. आय. टी. काॅलेजचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी २०१४ ला मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे. 

हुक्केरी तालुक्यातील यरनाळ या लहान खेड्यातील प्रफुल्ल देसाई यांनी युपीएससीत यश संपादन केले आहे. त्यांच्या घरची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची आहे. 

रायबाग तालुक्यातील कुडचीमधील गजानन शंकर बाले यांनी युपीएससीमधून यश संपादन केले. त्यांचे वडील उगार साखर कारखान्याचे कर्मचारी आहेत. त्यांनी आयपीएस होण्याचा मानस व्यक्त केला आहे.

प्रियांका कांबळे यांचे मूळगाव हुक्केरी तालुक्यातील केस्ती हे असले तरी कुटुंबीय चिक्कोडी येथे वास्तव्यास आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थिनी असूनही त्यांनी हे यश मिळवित मुलींसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे.

प्रथमच पाच जणांची बाजी

कारदगा (ता. निपाणी) येथील अभिजित शेवाळे हे या पूर्वी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यानंतर आता जिल्ह्यात पहिल्यांदाच एकदम चौघांनी युपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. त्यामुळे प्रशासकीय सेवेकडे युवकांचा कल वाढण्यासाठी अनुकुल वातावरण तयार होणार आहे.


ग्रामीण भागातील असूनही दडपण झुगारले

ग्रामीण भागातील असूनही या पाच जणांनी मनावरील दडपण झुगारून या परीक्षेच्या रूपाने यशाचे शिखर गाठण्यात यश मिळविले आहे. त्यातून या युवकांनी ग्रामीण युवकांसमोर आदर्श निर्माण केल्याने कौतूक होत आहे.

संपादन - धनाजी सुर्वे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com