esakal | पदवीधरांची सेवा करण्याच्या उद्देशानेच निवडणुकीला उभा
sakal

बोलून बातमी शोधा

Bharatiya Janata Party graduate constituency candidate Sangram Singh Deshmukh speech for BJP rally

संग्रामसिंह देशमुख; पदवीधरांसाठी रिंगणात, भाजपचा मेळावा

पदवीधरांची सेवा करण्याच्या उद्देशानेच निवडणुकीला उभा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पदवीधरांचा कौशल्य विकास, उद्योगांसाठी पतपुरवठा यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ उभारणे आवश्‍यक आहे. पदवीधरांना अल्प व्याजदरात पतपुरवठा झाला तर ते उद्योग उभारू शकतात. त्यातून रोजगारनिर्मिती होऊ शकते. विधान परिषदेच्या माध्यमातून पदवीधरांची सेवा करण्याच्या उद्देशानेच निवडणुकीला उभा आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी केले. हॉटेल अयोध्यामध्ये झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. सरचिटणीस विजय जाधव यांनी प्रास्ताविक केले.


जिल्हाध्यक्ष (महानगर) राहुल चिक्कोडे म्हणाले, ‘‘शहरात १९ हजार मतदार आहेत. यातील बहुतांश मतदारांची नोंदणी कार्यकर्त्यांनी केली आहे. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्ते मतदाराच्या घरी जाऊन त्यांच्यापर्यंत पक्षाची भूमिका पोचवतात. म्हणूनच पदवीधर मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. शहरामध्ये बूथप्रमाणे कार्यकर्त्यांची रचना केली आहे. प्रत्येक मंडलाला तीन पदाधिकारी जोडले आहेत. त्यामुळे निवडणुकीतही विजय भाजपचाच होणार आहे.’’


पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, ‘‘आमचे कॅप्टन चंद्रकांत पाटील आहेत. त्यांनी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला आमदार करण्याचा शब्द दिला आहे. तो कधीच खाली पडू देणार नाही. तुम्हाला पाचही जिल्ह्यांतून प्रचंड मतांनी विजयी करू.’’


माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘‘पदवीधर मतदारसंघाची निवडणूक क्‍लिष्ट आहे. मतदारसंघ मोठा असून संपर्क करणे अवघड आहे; पण आपल्यासाठी कमी कालावधीत अधिक प्रचार करणे शक्‍य आहे, कारण हा मतदारसंघ बहुतांश वेळा भाजपकडेच राहिला आहे. येथून निवडून आलेले प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील मोठ्या पदांवर गेले आहेत. संग्रामसिंह देशमुख यांना ही संधी आहे. देशमुख यांच्या रूपाने चांगला उमेदवार मिळाला. पदवीधरांना युवा उमेदवार मिळाले. ते ४५ वर्षांचे आहेत. 


महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे वय ७३ आहे. ते पदवीधरांचे प्रश्‍न कसे समजून घेतील, हा प्रश्‍नच आहे. देशमुख यांनी सांगलीत पक्ष वाढवला. शिक्षण, सहकार, बॅंकिंग, उद्योग क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. जनतेत मिसळणारा नेता असल्याने ते लोकप्रिय आहेत. राज्य सरकारचा कारभार पाहिल्यावर आता महाविकास आघाडीला मते मिळतील असे वाटत नाही.’’


संग्रामसिंह देशमुख म्हणाले, ‘‘महाडिकांनी लोकसभेत उत्तम काम करून आदर्श खासदार कसा असावा ते दाखवून दिले. सामाजिक जाणिवेतून राजकारणात सक्रिय कसे राहावे हे महाडिक कुटुंबाकडून शिकण्यासारखे आहे. महाडिक कुटुंबामुळेच मला सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. सरकारच्या माध्यमातून पदवीधरांना मदत करण्याची माझी भूमिका आहे. पदवीधरांना रोजगार मिळण्यासाठी त्यांच्यातील कौशल्य विकास झाला पाहिजे. यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रशिक्षण केंद्र उभारले पाहिजेत. स्किल इंडिया आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून पदवीधरांसाठी विविध योजना कार्यान्वित करणे आवश्‍यक आहे. दुष्काळी भागात पदवीधरांच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यांना जर अल्प व्याजदरात पतपुरवठा झाला तर तेथे चांगले उद्योग उभारू शकतील. यासाठी पदवीधरांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले पाहिजे. अर्थसंकल्पात पदवीधरांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे.’’

हेही वाचा- मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार आवाडे यांना दिली अशी  ‘ऑफर’


माणिक पाटील (चुयेकर), नगरसेवक नाना कदम, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, किरण नकाते, अशोक देसाई, हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, गणेश देसाई, चंद्रकांत घाटगे, हर्षद कुंभोजकर, गायत्री राऊत, नगरसेविका रुपाराणी निकम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

जि. प. अध्यक्षांची फजिती
धनंजय महाडिक म्हणाले, ‘‘संग्रामसिंह देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुरस्कार जिल्हा परिषदेला मिळवून दिले. आमच्याकडे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांनी एकूण निधीपैकी अर्धा निधी आपल्या गावातील शाळेलाच नेला. त्यांची पत्नी त्याच संस्थेची पदाधिकारी आहे. आता हे प्रकरण न्यायालयात गेल्याने त्यांची फजिती झाली.’’

कारखान्याएवढे घरचे बिल 
महाडिक म्हणाले, ‘‘लॉकडाउनपूर्वी घरचे वीजबिल २५ हजार रुपयांपर्यंत यायचे. लॉकडाउन काळात ते तीन लाख रुपये आले आहे. माझे घर आहे की साखर कारखाना, असा प्रश्‍न मला पडला.’’महाडिक म्हणाले, ‘‘लॉकडाउनपूर्वी घरचे वीजबिल २५ हजार रुपयांपर्यंत यायचे. लॉकडाउन काळात ते तीन लाख रुपये आले आहे. माझे घर आहे की साखर कारखाना, असा प्रश्‍न मला पडला.’’

संपादन- अर्चना बनगे