धक्कादायक : जिथे शिक्षण, आर्थिक समृद्धी आहे, तिथेच होतंय गर्भलिंग निदान...

Big challenge to prevent female feticide in Kolhapur district
Big challenge to prevent female feticide in Kolhapur district

कोल्हापूर - मुलगा वंशाचा दिवा आणि मुलगी परक्‍याचे धन, मुलीच्या जन्माकडे आपुलकीने न पाहण्याची मानसिकता यामुळेच स्त्री-भ्रूणहत्येचे प्रमाण वाढले असून गर्भलिंग निदान करणाऱ्या या टोळीच्या रूपाने अशा लोकांना ती संधी मिळाली आहे. अशा टोळ्यांकडून मुलीचा गर्भ मारून टाकण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हे रोखणे मोठे आव्हान आहे. आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा टोळ्यांचे फावले असून या यंत्रणांनीच आता कारवाई करण्याची गरज आहे. 

ही गोष्ट भयानक

अलीकडच्या आकेडवारीनुसार दर हजारी पुरुषांमागे मुलीच्या जन्माचे प्रमाण ९२५ आहे. पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या कोल्हापूरसाठी ही गोष्ट शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील काही अपप्रवत्तींमुळे हे सर्व घडत आहे. गर्भलिंग निदान करून देणाऱ्या टोळीने त्यासाठी एजंटांची साखळी उभी केली आहे. या साखळीच्या माध्यमातून सावज शोधून त्यांच्याकडून मनाला येईल तेवढी रक्कम घेऊन गर्भलिंग निदान करून दिले जाते, या चाचणीत मुलगीच असेल तर गर्भपातही करून दिला जातो, ही गोष्ट भयानक आहे. 
जिथे शिक्षण, आर्थिक समृद्धी आहे, तिथेच गर्भलिंग निदान मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. राज्यात कोल्हापूरसह अहमदनगर, जळगाव, पुणे सारख्या जिल्ह्यात हे प्रमाण जास्त आहे. या तुलनेत गोंदीया, गडचिरोली सारख्या अप्रगत जिल्ह्यात हे प्रमाण कमी असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. 

महिला संघटनांनी वेळोवेळी उठवलेल्या आवाजामुळे सरकारने राष्ट्रीय पातळीवर कायदा करून गर्भलिंग चिकित्सेचा दुरूपयोग करण्यावर बंदी घातली. विशेष म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे जिथे हा कायदा १९८८ साली अंमलात आला. १९९४ पासून तो देशभर लागू झाला. २००३ मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली. गर्भधारणेपुर्वी किंवा गर्भधारणेनंतर गर्भलिंग निवडीवर बंदी व अनुवांशिक विकृत्ती शोधण्यासाठी असलेल्या तंत्रज्ञानाचा गर्भलिंग निदानासाठी दुरूपयोग करण्यावर या कायद्याने बंदी घातली. या गुन्ह्याचे उल्लंधन करणाऱ्या डॉक्‍टरांवर तीन वर्षापर्यंत कैद आणि दहा हजार रूपये दंडाची तरतूद करण्यात आली. पुन्हा हाच गुन्हा केल्यास संबंधित डॉक्‍टराला पाच वर्षे शिक्षा व ५० हजार रूपये दंड करण्यात आला. याशिवाय मेडिकल कौन्सिलमधील नोंदणी रद्द करण्यात आली. पण एवढा कायदा कडक असूनही जिल्ह्यात दिवसाढवळ्या गर्भलिंग निदान चाचणी होऊन स्त्रीभ्रूण हत्या करण्याचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

तालुकानिहाय जानेवारीची आकडेवारी

तालुका               पुरूष जन्म        स्त्री जन्म             एकूण सेक्‍स रेषो (० ते ६ वयोगट)

आजरा                ३७७३           ३७२४            ७४९७                ९८७
भुदरगड               ५९२९            ५४५०           ११३७९              ९१९
चंदगड                ७६६७            ७६६४           १५३३१              १०००
गडहिंग्लज            ८०२१            ७९३९            १५९६०            ९९०
गगनबावडा           १५६१            १५७३             ३१३४              १००८
हातकणंगले           २४५७६        २३२५१           ४७८२७            ९४६
कागल                १०३४७         ९५४८              १९८९५            ९२३
करवीर                 २१८५३        २०००८           ४१८५९              ९१६
पन्हाळा               १०७४७         ९८५९              २०६०६            ९१७
राधानगरी              ८०६८           ७३७८            १५४४६           ९१४
शाहुवाडी              ६९७१           ६७४२              १३७१३            ९६७
शिरोळ                 १३२०८         १२११३            २५३२१            ९१७
......................................................................................
एकूण               १२२७२१         ११५२४७            २३७९६८           ९३९
 

गगनबावडा तालुका भारीच

शैक्षणिक आणि आर्थिक सुबत्ता असलेल्या तालुक्‍यांत गर्भलिंग निदानाचे प्रमाण जास्त आहे. दुसरीकडे सर्वच बाबतीत दुर्लक्षित आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या गगनबावडा तालुक्‍यात मात्र स्त्री जन्माचे प्रमाण हे पुरुष जन्मापेक्षा जास्त आहे. जानेवारी २०१९ मध्ये केलेल्या पाहणीत गगनबावडा तालुक्‍यात दर हजारी पुरुषामागे १००८ स्त्री जन्माचा दर आहे. यावरून गगनबावडा तालुकाच जिल्ह्यात भारी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com