महावितरणच्या कारभारावरून चंदगडला खडाखडी

सुनील कोंडुसकर
Saturday, 21 November 2020

चंदगड येथील पंचायत समितीच्या मासिक बैठकीत महावितरणच्या कारभारावरून घमासान चर्चा झाली. कंपनीचे कर्मचारी ग्राहकांना दाद देत नाहीत. फोन केल्यास उद्धट उत्तरे देतात. अशा कर्मचाऱ्यांची मुजोरी उतरवावी लागेल. त्यांनी कामात सुधारणा करावी, अन्यथा बदली करून जावे, असा इशारा सभापती ऍड आनंत कांबळे यांनी दिला. 

चंदगड : येथील पंचायत समितीच्या मासिक बैठकीत महावितरणच्या कारभारावरून घमासान चर्चा झाली. कंपनीचे कर्मचारी ग्राहकांना दाद देत नाहीत. फोन केल्यास उद्धट उत्तरे देतात. अशा कर्मचाऱ्यांची मुजोरी उतरवावी लागेल. त्यांनी कामात सुधारणा करावी, अन्यथा बदली करून जावे, असा इशारा सभापती ऍड आनंत कांबळे यांनी दिला. 

गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे यांनी स्वागत केले. संजय चंदगडकर यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. महावितरण कंपनीचा विषय आल्यानंतर सर्वच सदस्यांनी कंपनीच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कंपनीचे अभियंता विशाल लोधी यांनी कामकाजाचा आढावा घेतला. नादुरुस्त कामे दुरुस्त केल्याचे तसेच गंजलेले खांब बदलल्याची आकडेवारी सादर केली, परंतु त्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. अन्य वेळेला कंपनीचे कर्मचारी उद्धट वागत असल्यावरून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत तालुक्‍याला 592 घरांचे उद्दिष्ट आले आहे. त्यापैकी 309 लाभार्थ्यांचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले असल्याचे विस्तार अधिकारी अमृता देशपांडे यांनी सांगितले. रमाई व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत एकही प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, 2018 ते 2020 मध्ये बांधकाम झालेल्या घरांना अद्यापही अनुदान प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले. इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा 23 तारखेपासून सुरू होत असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे यांनी सांगितले. पंचायत समितीकडे मुख्याध्यापकांची दोन, तर मदतनीस अध्यापक 23 व 48 अध्यापकांची पदे रिक्त असल्याचे सांगण्यात आले.

ग्रामपंचायत विभागाकडून एकूण घरपट्टीच्या 22.40 टक्के, तर पाणीपट्टीच्या 24.50 टक्के वसुली झाली असल्याचे विस्तार अधिकारी ठोंबरे यांनी सांगितले. जगन्नाथ हुलजी यांनी चर्चेत सहभाग घेतला. उपसभापती मनीषा शिवणगेकर यांनी आभार मानले. 

परस्पर नोंदी घालत असल्याची तक्रार 
नवीन घरांची नोंदणी करत असताना ग्रामपंचायतीचे उत्पन्न कसे वाढेल, याची दक्षता घ्यायला हवी, मात्र ग्रामसेवक परस्पर नोंदी घालत असल्याची तक्रार बबन देसाई यांनी केली. याबाबत ग्रामपंचायत स्तरावर बैठक घेऊन किंमत ठरवण्याची सूचना गटविकास अधिकारी बोंडरे यांनी केली.  

 
संंपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandgad Is Displeased With The Management Of MSEDCL Kolhapur Marathi News