चार पुलांसाठी 15 कोटी खर्च करूनही गावे संपर्कहीनच... वाचा चंदगड तालुक्‍यातील "या' गावांची व्यथा

सुनील कोंडुसकर
Monday, 10 August 2020

घटप्रभेच्या दक्षिण तीरावरील कुरणी, बुझवडे, गवसे, इब्राहीमपूर आदी गावे पूरस्थितीत संपर्कहीन होतात. बेटाचे स्वरुप येते.

चंदगड : गवसे, इब्राहीमपूर परिसराला पूर स्थितीत बेटाचे स्वरुप येऊ नये, एकतरी मार्ग खुला रहावा या हेतूने गेल्या वीस वर्षात नवनवीन चार पुल उभारले. त्यासाठी सुमारे पंधरा कोटी रुपये खर्ची पडले. परंतु वास्तव काय, तर आजही हा परिसर संपर्कहीनच आहे. इतकी मोठ्ठी रक्कम खर्च करताना बांधकाम अभियंत्यांनी कसले आराखडे केले असा प्रश्‍न या परीसरातील नागरीक विचारत आहेत. 

घटप्रभेच्या दक्षिण तीरावरील कुरणी, बुझवडे, गवसे, इब्राहीमपूर आदी गावे पूरस्थितीत संपर्कहीन होतात. बेटाचे स्वरुप येते. अशा गावांना जोडणारा एकतरी मार्ग हवा या नियमानुसार गेल्या पंचवीस वर्षात चार पुल उभारले. परंतु ते बिनकामी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. सुरवातीच्या काळात इब्राहीमपूर नजीक मांगलेवाडी येथे पूल उभारला. त्यानंतर नांदुरे येथे ओढ्यावर पूल बांधला.

ही दोन्ही बांधकामे रस्त्याला समांतर असल्याने पुराचे पाणी त्यावरुन वाहते. त्यानंतर कुरणी येथे पाच कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी पूल बांधला. या वर्षी म्हाळुंगेच्या दिशेने रस्त्यावर पाणी आल्याने या पुलाचा वापरच होऊ शकला नाही. हीच अवस्था गवसे पुलाची. इथेही पाच कोटीहून अधिक रक्कम खर्च करून पुल उभारला आहे. त्यावेळी स्थानिक सर्वसामान्य नागरीकांनी चुकीच्या बांधकामावर आक्षेप घेतला होता. त्याकडे दूर्लक्ष केले गेले.

गवसेच्या बाजूने सुमारे दिडशे फूट भराव टाकला असून तिथे पाणी तटते. हा तुंब रस्त्यावर येतो. त्यातून वाहतुक करता येत नाही. मग एवढी रक्कम खर्च करुन काय साधले असा प्रश्‍न या विभागातील नागरीक विचारत आहेत. 

किमान प्राथमिक आरोग्य केंद्र गरजेचे
नियोजनाअभावी बांधलेले पूल असून अडचण नसून खोळंबा आहेत. उच्चशिक्षित अभियंत्यांच्या नियोजनाबाबतही शंका घेण्यासारखी स्थिती आहे. पूर स्थितीत गंभीर स्थिती उद्भवल्यास काहीच पर्याय नसल्याने या विभागासाठी किमान प्राथमिक आरोग्य केंद्र असणे गरजेचे आहे. 
- रमेश देसाई, सामाजिक कार्यकर्ते, गवसे 

 

संपादन - सचिन चराटी

 

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Chandgad Taluka Villages Remain Contactless Kolhapur Marathi News