३५ राज्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण झाडांची होणार लागवड कोल्हापुरात

मोहन मेस्त्री  
Monday, 25 January 2021

विविधतेने नटलेल्या देशाची अखंडता दाखविण्यासाठी कोल्हापुरात वृक्षांचे प्रजासत्ताकच तयार करण्यात येणार आहे.

कोल्हापूर : विविधतेने नटलेल्या देशाची अखंडता दाखविण्यासाठी कोल्हापुरात वृक्षांचे प्रजासत्ताकच तयार करण्यात येणार आहे. राजारामपुरी टाकाळा येथील हरित पट्ट्यावर या ३५ राज्यांची ओळख असलेल्या ३५ जातींच्या झाडांचे रोपण एकाच  ठिकाणी होणार आहे. तसेच, त्या-त्या राज्याचा नकाशा आणि झाडाची माहिती असणारा फलक प्रत्येक झाडाजवळ लावला जाईल. 

 प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा केला जातो. देशात ३५ घटक राज्यांची निर्मिती केली त्यावेळी प्रत्येक राज्याचा पक्षी, प्राणी आणि वैशिष्ट्यपूर्ण झाडही ठरवले. महाराष्ट्राचा वृक्ष  आंबा, गोवा राज्याचा नारळ तसेच शेजारच्या कर्नाटक राज्याचे चंदन अशी ही वृक्षसंपदा आहे.देशाची अखंडता हिरवाईतुनही दिसावी या दृष्टीकोणातून ३५ घटक राज्यांच्या झाडाचे रोपण एकाच ठिकाणी करण्यात येणार आहे.  कोल्हापुरात वूक्ष लागवड आणि संवर्धन करणाऱ्या वृक्षप्रेमी संस्थेतर्फे या झाडांची लागवड केली जाणार आहे. रोपांचे संकलन करण्याचे काम शहरातील विविध नर्सरी करणार आहेत.

हेही वाचा- सावधान:  अल्पवयीन मुलांकडून अपघात झाल्यास पालकांना होणार शिक्षा

अनेक राज्यांमधून हे झाडे मागवून लागवड होणार आहे. यासाठी हरित पट्ट्यात खड्डे मारण्याचे काम केले आहे.  यावेळी झेंडांवंदन करण्यात येणार आहे. त्यासाठी निवृत्त सेनाअधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. जिल्ह्यातील  वीरमाता यांच्या हस्ते त्यांच्या मुलांचे योगदान जनतेच्या लक्षात राहावे यासाठी त्यांच्या हस्तेही लागवड होणार आहे.

हेही वाचा- गडहिंग्लजला फळभाज्या, सोयाबीनचे दर तेजीत -

एकाच जागी प्रत्येक राज्याच्या विशेष झाडाची लागवड करण्यात येणार आहे. बहुधा असा प्रयोग देशभरात कोठेही केला गेलेला नाही. ३५ राज्यांची ओळख एकाच ठिकाणी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे.
- अमोल बुढ्ढे, वृक्षप्रेमी संस्था

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Characteristic trees of 35 states planted in Kolhapur marathi news