नदी, तलावाठिकाणी छटपूजेस बंदी 

सुनील पाटील 
Thursday, 19 November 2020

जिल्हा प्रशासनाकडून पंचगंगा नदी घाटावर छटपूजा करण्यास बंदी घातली आहे

कोल्हापूर : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी नदी किनार, तलावाच्या ठिकाणी होणाऱ्या छटपूजेस यंदा परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे, नदीकाठी व इतर पाणथळा ठिकाणी छटपूजा करु नये असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीसह इतर नदीच्या ठिकाणीही छटपूजेस बंदी असणार आहे. तसेच, पूणे पदवीधर मतदार संघासाठी सुरु असलेल्या आचार संहितेचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या आहेत. 

श्री. देसाई यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यात जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तवली आहे. लोकांनी घरी आणि सुरक्षित रहावे असे वेळोवेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, छटपूजेनिमित्त भाविक नदी काठी किंवा तलावाकाठी जमून सार्वजनिकरित्या पूजा करु शकतात. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे पानथळांवर छटपूजा केली जावू नये. शहरी भागासाठी महानगरपालिका क्षेत्रामध्ये विभाग स्तरावर व ग्रामीण भागामध्ये तालुका पातळीवर छटपूजेसाठी परवानगी मागणाऱ्या संस्थेस कृत्रिम तलाव बांधता येईल. तसेच, बांधलेला तलाव बुजवण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. कृत्रिम तलाव केला तरीही त्या ठिकाणी गर्दी होवू नये, याचीही खबरदारी घ्यावी. पोलीस प्रशासनानेही अशा तलावांवर नजर ठेवावी. गर्दी होत असलेल्या कृत्रिम तलावाजवळ कडक बंदोबस्त ठेवावा. तसेच, याच तलावाजवळ कोरोना तपासणी चाचणीचे सर्व साहित्य तयार ठेवावे. निर्माल्य व कलश तलावाच्या ठिकाणीच ठेवण्यात यावे. तसेच ध्वनी प्रदुषण होणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी. सामाजिक अंतर न राखता जमाव होवू नये. एकावेळी 50 पेक्षा जास्त व्यक्तिंना उपस्थित राहता येणार नाही. कृत्रिम तलावाव जे लोक छटपूजेसाठी येतील त्यांच्या तोंडाला मास्क असणे बंधनकारक आहे. 

राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघाच्यावतीने छटपूजेची सर्व तयारी केली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून पंचगंगा नदी घाटावर छटपूजा करण्यास बंदी घातली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या प्रतिबंधित कारवाईमूळे कोल्हापूर व इचलकरंजी घाटावरी सुर्यषष्ठी व्रत व पूजा रद्द करण्यात आली आहे. दम्यान, भाविकांनी आपआपल्या घरीच पूजा करावी, असे आवाहन राजर्षी शाहू पुर्वोत्तर भारतीय संघाचे कार्यकारी अध्यक्ष ओमनारायण मिश्रा व कार्यकारणीच्यावतीने करण्यात आले आहे.

हे पण वाचा -  हृदयद्रावक : केवळ उपचार न मिळाल्याने मातेसह बाळाचा मृत्यू

 
  छटपूजेसाठी अशा आहेत नियम-अटी : 
- दहा वर्षाखालील व 65 वर्षावरील लोकांना छटपूजेत सहभाग नाही 
- ताप, सर्दी, खोकला असणाऱ्यांना व्यक्तिंना प्रवेश देवू नये 
- छटपूजेसाठी एकमेकांचे साहित्य वापरू नये 
- कार्यक्रमाच्या ठिकाणी साबण, सॅनिटायझर उपलब्ध करुन ठेवावे 
- पूणे पदवीधर मतदार संघातील आचार संहितेचे पालन करावे 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhatpujes banned at rivers and lakes