कोल्हापुरात नागरिकांकडून येत आहेत अशी उत्तरे ; पोलीस मात्र होत आहेत अवाक्

युवराज पाटील
Thursday, 17 September 2020

मास्क न लावल्याबद्दल कारवाई करताना मास्क का लावला नाही, याची कारणेही मजेशीर आहेत.

कोल्हापूर : लॉकडाउनमुळे रोजगार नाही, पैसे कोठून आणायचे, कारवाईचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, बेड नाहीत तर कसली कारवाई करता, अशी मास्क न लावणाऱ्यांची कारणे ऐकून केएमटी कर्मचारी, पोलिस अवाक्‌ होत आहेत. मास्क न लावल्याबद्दल कारवाई करताना मास्क का लावला नाही, याची कारणेही मजेशीर आहेत. महिला, मुली नियम पाळतात. मात्र तरुण उद्धट उत्तरे देत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक ;  गोकुळ दूध रोखण्याचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात 

 

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, नियमांचे पालन व्हावे, यासाठी पालिका व पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. प्रमुख चौकांत अथवा वाहनांची ज्या भागात वर्दळ असते, तेथे सकाळी साडेदहाला ‘केएमटी’चे कर्मचारी जातात. मास्क न लावलेला वाहनचालक नजरेस पडला, की कर्मचारी गाडी बाजूला घेण्याची विनंती करतात. गाडी अडविली का, म्हणून अरेरावी करणाऱ्यांची संख्या कमी नाही. रोज किती जणांशी वाद घालत बसायचे म्हणून कर्मचाऱ्यांनी वैतागून रुग्णालयांच्या ठिकाणी ड्यूटी घेतली.

हेही वाचा -  आमदार विनय कोरेंच्या वाटचालीत हा आहे हुकमी नंबर 

 

तीन प्रभागांसाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. जे मास्क लावत नाहीत, त्यांची उत्तरे मात्र मजेशीर आहेत. एकतर गाडी अडविल्याचा राग असतो. दंडाची पावती करा म्हटले, की मग प्रश्‍नांची सरबत्ती सुरू होते. मास्क घरी विसरला इथंपासून ते पावती करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? बेड शिल्लक नाहीत तिकडे अधिक लक्ष द्या, अशी कारणे सांगितली जातात. पावतीची सक्ती केल्यावर वशिल्याचे फोन सुरू असतात. अमूक एकाला सांगतो, तमुक एकाशी बोला असाही सल्ला दिला जातो. एखादा जास्त वाद घालू लागला तरी गाडीच्या नंबरचा फोटो काढून तो कोविड ग्रुपवर पाठविला जातो.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizens answered by a police and employee of government in kolhapur related to corona