
फकीर मळा, हनुमाननगर भागातील विद्युत खांब उभारणीचे काम दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याने या भागातील नागरिकांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या विद्युत विभागाला टाळे ठोकले.
इचलकरंजी : फकीर मळा, हनुमाननगर भागातील विद्युत खांब उभारणीचे काम दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याने या भागातील नागरिकांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या विद्युत विभागाला टाळे ठोकले. ठिय्या आंदोलन करून नगरपालिका प्रशासनाचा धिक्कार करत निषेध नोंदवला. मुख्याधिकारी दालनात पुन्हा ठिय्या मारला. दोन तासांच्या चर्चेनंतर प्रशासनाच्या आश्वासनंतर आंदोलन मागे घेतले, मात्र येत्या आठ दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन नगरपालिकेलाच टाळे ठोकण्याचा इशारा नगरसेवक राजू बोंद्रे यांनी दिला.
इचलकरंजीतील प्रभाग दहामधील फकीर मळा, हनुमाननगर, कोले मळा हा परिसर कामगार वस्तीचा वाढीव भाग आहे. येथे 35 वर्षांपासून विद्युत खांबाची सोय नाही. रात्री या परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्याने घरासमोरील वाहन चोरी, वाहनातील इंधन, बॅटऱ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भागात विद्युत खांबाची सोय झाल्यास सर्व प्रकार थांबतील, या उद्देशाने नगरसेवक राजू बोंद्रे यांनी नगरपालिका सभेत भागातील विद्युत खांबासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
2019 मध्ये हा विषय मंजूर करून त्या कामाचे कार्यादेशही मक्तेदाराला दिले आहेत, पण दोन वर्षे झाली तरी कार्यादेश मिळूनही संबंधित मक्तेदाराने काम सुरू केले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने या कामाची पूर्तता न झाल्यास विद्युत विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा आठ दिवसांपूर्वी दिला होता. तरीही प्रत्यक्ष काम न सुरू झाल्याने आज नागरिकांसोबत येऊन विद्युत विभागाला टाळे ठोकून प्रवेशद्वारातच ठिय्या मारला.
सुमारे अर्धा तासाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी समजूत काढून त्यांना मुख्याधिकारी दालनात चर्चेसाठी नेले. यावेळी उपमुख्याधिकारी केतन गुजर यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित केल्याने आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्वरित काम सुरू होणार नसेल तर आम्ही नगरपालिकेचा कर भरणार नाही, अशी भूमिका घेतली. सुमारे दोन तासांच्या चर्चेनंतर मक्तेदारांशी पत्रव्यवहार करून लवकर काम सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
यावेळी बोंद्रे यांनी आठ दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास नगरपालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा देऊन आंदोलन स्थगित केले.
आंदोलनात भारत पोवार, ईलाही मुजावर, दस्तगीर सनदी, सतीश घोरपडे, हारुण मोमीन, राजदीप सनगर, सलमान शेख, अरुणा जाधव, कविता पाटील, ज्योती गोडसे, अल्लाबी शेख, शहनाज फकीर, नजमा शेख यांच्यासह भागातील नागरिक सहभागी झाले होते.
भटक्या कुत्र्यांना आवरा
विद्युत पोल नसल्याने सर्व ठिकाणी अंधार आहे. घरातील लहान मुले खेळण्यासाठी बाहेर पडतात, मात्र येथे अंधारामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. शहरात इतर ठिकाणी घडणाऱ्या घटना पाहून निदान आमच्या मुलांच्या जीवाचा विचार करून भटक्या कुत्र्यांना आवरा आणि विद्युत पोल उभारा, अशी मागणी महिलांनी केली.
संपादन - सचिन चराटी
kolhapur