सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

हिल्यांदा 18 मार्च 2020 रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुका पहिल्यांदा तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या.

कोल्हापूर - कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नव्या आदेशानुसार 31 डिसेंबर 2020 पर्यंत या निवडणुकींना शासनाने आज स्थगिती दिली. जिल्ह्यातील प्रमुख सत्ता केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ), जिल्हा बॅंकेसह अनेक साखर कारखाने व छोट्या मोठ्या चार हजार संस्थांचा यात समावेश आहे. 

राज्यात मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडला तर त्याच दरम्यान देशातील काही राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. या पार्श्‍वभुमीवर केंद्र सरकारने 23 मार्चपासून देशभर लॉकडाऊन जाहीर केला. त्यातून पहिल्यांदा 18 मार्च 2020 रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुका पहिल्यांदा तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या. तीन महिन्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहील्याने 17 जून 2020 रोजी दुसऱ्या या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. ही मुदत आज संपल्याने व कोरोनाची परिस्थिती जैसे थे असल्याने शासनाने या निवडणुकींना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. 

हे पण वाचाह्रदयद्रावक! आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या दाम्पत्याचा शेवटही सोबतच

 जिल्ह्यात "गोकुळ' च्या विद्यमान संचालकांची मुदत 13 एप्रिल रोजी तर जिल्हा बॅंकेच्या संचालकांची मुदत मे 2020 रोजी संपली आहे. याशिवाय जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांची मुदतही जून 2020 पर्यंत संपली आहे. त्याचबरोबर प्राथमिक दूध संस्था, विकास सोसायट्या यांच्याही विद्यमान संचालकांची मुदत यापुर्वीच संपली आहे. अशा सुमारे चार हजार संस्थांच्या निवडणुका या निर्णयाने पुन्हा लांबवणीवर पडणार आहेत. 

हे पण वाचाKolhapur CPR Fire Update : मेन स्विच बंद केला नसता तर... 

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Co operative elections postponed again