कोल्हापुरात उद्या कॉंग्रेसची भव्य "शेतकरी बचाव रॅली'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

लोकशाही, संविधान व संसदेचे नियम पायदळी तुडवून केंद्रातील भाजप सरकारने तीन शेतकरी विरोधी काळे कायदे आणले आहेत.

कोल्हापूर - शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी उद्या (ता. 15) महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने राज्यात सहा ठिकाणी भव्य "शेतकरी बचाव रॅली' व्हर्चुअल सभेचे आयोजन केले आहे. या रॅली मध्ये सहभागी शेतकऱ्यांशी खासदार राहुल गांधी हे ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यातील एक सभा कोल्हापूरात जिल्हा कॉंग्रेस कमिटी मध्ये सायंकाळी चार वाजता मर्यादित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमात कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. 

लोकशाही, संविधान व संसदेचे नियम पायदळी तुडवून केंद्रातील भाजप सरकारने तीन शेतकरी विरोधी काळे कायदे आणले आहेत. या काळ्या कायद्याविरोधात कॉंग्रेस पक्ष देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. या विरोधात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाने देशव्यापी लढाई सुरु केली आहे. 
या आंदोलनाचा पुढचा टप्प्यात उद्या (ता. 15) दुपारी चार वाजता शेतकरी बचाओ रॅली व्हर्चुअल सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रम राज्यातील सहा ठिकाणांहून एकाच वेळी होणार आहे.

हे पण वाचा दोन अट्टल घरफोड्यांना अटक ; 21 तोळे दागिन्यांसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

 हे सर्व कार्यक्रम एकमेकाशी इंटर कनेक्‍ट असून सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून कॉंग्रेस नेते राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. कोल्हापूरातील या सभेला आमदार पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, राजू आवळे, कॉंग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच कोल्हापूर जिल्हयातील विधानसभा मतदारसंघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेसह विविध गावा गावातील शेतकरी या व्हर्चअल सभे मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress to hold grand Farmers Rescue Rally in Kolhapur tomorrow