शेतकरी कायद्यांना कॉंग्रेसचा रस्त्यावर उतरून विरोध

 Congress opposes farmers' laws
Congress opposes farmers' laws

कोल्हापूर : केंद्र सरकारने तीन शेतकरी कायदे आणले आहेत. ते शेतकरी विरोधी असून बड्या उद्योजकांना धार्जिणे आहेत. यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत, कॉंग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरुन संपूर्ण देशभर या कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे. राज्यसभेत बहुमत नसताना केवळ गोंधळाच्या परिस्थितीत हे कायदे मंजूर करून संसदीय मर्यादांचे उल्लंघन केले आहे, अशी घणाघाती टीका कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केली. 
कॉंग्रेसच्या "शेतकरी बचाओ रॅली'त (व्हर्चुअल) ते संगमनेर येथून बोलत होते. दरम्यान, कोल्हापूर येथून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील, संपर्कप्रमुख देविदास भन्साळी, महापौर निलोफर आजरेकर, आमदार पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जिल्हापरिषद अध्यक्ष बजरंग पाटील, नगरसेवक शशांक बावचकर, सचिन चव्हाण आदींनी रॅलीत सहभाग घेतला. 

श्री. पाटील म्हणाले, ""पंतप्रधानांनी एकसारखे खोटे बोलण्याचा सपाटा लावला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र उत्पन्न दुप्पट झाले का, याची माहिती ते देत नाहीत. आताही शेतकरी कायदे हे हिताचे असल्याचे ते सांगत आहेत, मात्र ते कसे हिताचे आहेत, ते सांगत नाहीत. या कायद्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे हे कायदे रद्द करण्यासाठी 1 कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना देवून हे कायदे रद्द करण्याची मागणी केली जाईल. '' 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ""देशात किमान आधारभूत किंमत ही कॉंग्रेसने आणली. बाजार समित्या आणून हक्‍काची बाजारपेठ निर्माण केली. मात्र ही व्यवस्था मोडून अदानी, अंबानी यासारख्या बड्या उद्योगांना पायघड्या कालण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याची टीका त्यांनी केली.'' 
विश्‍वजित कदम म्हणाले, ""राज्य सरकारने शेतकऱ्यांना कृषी कर्जमाफी देऊन त्यांना मदतीचा हात दिला आहे. मात्र केंद्र सरकार कृषी कायदे करून शेतकऱ्यांना देशोधडीस लावण्यास निघाले आहे. मात्र कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरुन या कायद्याला विरोध करेल.'' 
व्हर्च्युअल सभेला मंत्री सुनील केदार, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, के. सी. पाडवी, विजय वडेटटीवार, नितीन राउत, राजीव सातव, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळसाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले. तर मुजफ्फर हुसेन यांनी आभार मानले. 

.केंद्राचे "विका' धोरण ः सतेज पाटील 
गृह राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, "" पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ला विकास पुरुष म्हणवून घेतात. मात्र या विकास मधील "स' गायब झाले असून केवळ विका हेच धोरण या सरकारचे राहिले असल्याची टीका त्यांनी केली. केंद्र सरकारने कामगार विरोधी कायदे करुन, शेतकरी विरोधी कायदे करुन त्यांना देशोधडीला लावण्याचे पाप केले आहे. मात्र कॉंग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांसोबत राहून या काळ्या कायद्यांना विरोध केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्‍त केला.

संपादन - यशवंत केसरकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com