इंधन दरवाढीच्या विरोधात "प्रांत'वर मोर्चा ; पोलिसांनी म्हशींना रोखले 

congress protest in ichalkaranji
congress protest in ichalkaranji

इचलकरंजी : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसतर्फे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी दुचाकी वाहने ढकलत नेत लक्ष वेधले तसेच पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवला. मोदी सरकारवर हल्लाबोल चढवत प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. 

मलाबादे चौक ते प्रांत कार्यालय या प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीच्या विरोधात निषेधात्मक घोषणा देत निदर्शने केली. मोदी सरकारच्या कार्यकाळातील इंधन दरवाढीचा चढता आलेख विविध लक्षवेधी फलकांच्या माध्यमातून मोर्चात मांडला. मनमोहन सिंगांच्या काळात कॉंग्रेसने इंधन दरवाढीवर नियंत्रण ठेवले होते; मात्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर सरकारने भांडवलदारांचे खिसे भरून सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारायला सुरवात केली आहे. कॉंग्रेस सत्तेवर असताना इंधन दरवाढीवर टीका करणारे भाजपचे मंत्री आता मात्र बोलती बंद करून शांत आहेत. केंद्र सरकारचे सर्व कायदे जनतेविरोधी असून सर्वसामान्यांचे शोषण होत आहे. इंधनाचे दर वाढल्याने देशांतर्गत संपूर्ण अर्स्थव्यवस्था उद्‌ध्वस्त झाली आहे. सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. या सर्व बाबींचा विचार करून पेट्रोल व डिझेलवरील अबकारी दर कमी करावेत व घरगुती गॅसचे दर कमी करून दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा राहुल खंजिरे यांनी दिला. शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे, शशांक बावचकर यांनीही संतप्त भावना व्यक्त केल्या. 

मागणीचे निवेदन शिरस्तेदार उदयसिंह गायकवाड यांनी स्वीकारले. मोर्चात बाबासाहेब कोतवाल, शशिकांत देसाई, शेखर पाटील, राजन मुठाणे, तौफिक नदाफ, आनंदा पवार, रवी वासुदेव, योगेश पंजवाणी, राजू आवळे, बंडू नेजे, अजित मिणेकर, दशरथ जाधव, प्रकाश पोवार, प्रथमेश देसाई यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
 
म्हशींना पोलिसांनी रोखले 
मोर्चाला मलाबादे चौकात सुरवात झाली. यावेळी कॉंग्रेसने लक्षवेधी मोर्चात दोन म्हशी आणल्या होत्या; मात्र म्हशींना परवानगी नसल्याने पोलिसांनी मोर्चा सुरू होताच दोन म्हशींना मज्जाव केला. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com