भक्तांची गर्दी असणाऱ्या सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर निरव शांतता...

मिलिंद देसाई
Friday, 15 May 2020

लॉकडाऊनमुळे 3 कोटींचा महसूल बुडाला...
 

बेळगाव - दररोज हजारो भक्तांची गर्दी असणाऱ्या सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगरावर अनेक दिवसांपासून निरव शांतता पहावयास मिळत आहे. तसेच लॉकडाऊनमुळे मंदिराच्या महसूलात मोठी घट झाली असून कोरोना संकटामुळे मंदिराचा 3 कोटींचा महसूल बुडाला आहे.  

महाराष्ट्र, कर्नाटक व देशभरातील लाखो भक्तांचे श्रध्दास्थान असणाऱ्या सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. दररोज पूजा आणि पारंपरिक धार्मिक विधी केल्या जात आहेत मात्र पूजा करताना सामाजिक अंतर राखले जात आहे. तसेच मंदिर परिसरात येणाऱ्या सर्वांची थर्मल चाचणी केली जात आहे. इतिहासात पहिल्यांदाच यल्लम्मा डोंगरावरील गर्दी पूर्णपणे ओसरली असून लॉकडाऊनमुळे सर्व व्यापारी आपल्या घरी परतले आहेत. तर जे व्यापारी डोंगरावर आहेत त्यांना आपली दुकाने बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.

वाचा - गृहिणींसमोर पुढिल वर्षभरासाठी हा आहे गंभीर प्रश्न

दवण्याची जत्रा आणि त्यानंतर सुट्टीचा मौसम यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात रेणुका देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते मात्र 25 मार्चपासून मंदिर बंद ठेवण्यात आल्याने डोंगरावरील गर्दी ओसरली आहे. तसेच व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेऊन घरी परतणे पसंद केले आहे. तर लॉकडाऊनचा सदुपयोग करून घेत मंदिर प्रशासनाने स्वच्छतेची कामे हाती घेतली आहेत. मात्र मंदिर बंद असल्याचा फटका येथील व्यापारी वर्गाला बसला असून मंदिर लवकर सुरू व्हावे आणि सर्व व्यवहार सुरळीत व्हावेत अशी प्रार्थना होऊ लागली आहे.
 

दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते मात्र मंदिर बंद ठेवण्याची सूचना करण्यात आल्याने महसुलात मोठी घट झाली आहे. येणाऱ्या काळात मंदिर सुरू झाल्यानतंर सामाजिक अंतर राखण्यावर भर दिला जाणार आहे.
बसवराज जिरगाळ, सहाय्यक कार्यकारी अधिकारी, रेणुका देवी मंदिर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona effect on Saundatti Yellamma temple