esakal | कोल्हापुरात आता कोरोनाच्या या रुग्णांवर होणार घरीच उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

corona patients will now be treated at home In Kolhapur

जिल्ह्यात एक जुलैपासून कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.

कोल्हापुरात आता कोरोनाच्या या रुग्णांवर होणार घरीच उपचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या पाच हजारच्या पुढे गेली आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. हा ताण कमी करण्यासाठी कोरोनाच्या ७० टक्के रुग्णांवर घरीच उपचार होणार आहेत. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, मात्र, लक्षणे दिसत नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशा रुग्णांवर घरी उपचार केले जाणार आहेत.

जिल्ह्यात एक जुलैपासून कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अंदाजापेक्षा ही संख्या मोठी होती. त्यामुळे या सर्व रुग्णांचे नियोजन करणे अडचणीचे झाले. वेळेत सेवा न मिळाल्याने काही रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांना बेड कमी पडू लागले आहेत तसेच उपचारही कमी पडत आहेत. हे वाढत्या संख्येने निदर्शनास आले असूनही पुढील महिनाभर तरी अशाच पद्धतीने संख्या वाढेल, असा अंदाज आरोग्य विभागाकडून व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील कोरोनाच्या रुग्णाला जर कोणतीच लक्षणे दिसत नसतील किंवा सौम्य लक्षणे असतील, तर त्याच्यावर घरीच उपचार करण्याची व्यवस्था केली आहे. एखाद्या जबाबदार व्यक्तीस यासाठी प्रशिक्षित केले जाणार आहे. संबंधित व्यक्तीला पीपीई किट, औषध उपचाराबाबत मार्गदर्शन, औषधे, संबंधित रुग्णाची घ्यावयाची काळजी, पल्सोमिटर आदी साहित्य दिले जाणार आहे.

हे पण वाचा - कोल्हापुरात खासगी रुग्णालयात केवळ चारच बेड ; व्हेंटिलेटरचा एकही बेड नाही शिल्लक


 जिल्ह्यात सध्या पाच हजार कोरोनाचे रुग्ण आहेत. यातील ७० टक्के रुग्णांना म्हणजेच जवळपास साडेतीन हजार रुग्णांना सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नाहीत. या रुग्णांवर घरीच उपचार झाले, तर हॉस्पिटलमधील बेड अत्यावश्‍यक सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दाखल रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण सौम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे अशा रुग्णांवर घरीच उपचार केले जाणार आहेत. यामुळे अत्यावश्‍यक रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार करता येतील.
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

संपादन - धनाजी सुर्वे