जात-धर्म, सीमावादापलीकडची माणुसकी..! त्या दोघींना साडेचार महिने दिला आधार

corona positive impact story White Army help for 4 month mom and daughter
corona positive impact story White Army help for 4 month mom and daughter

कोल्हापूर : कोरोनानं जगभरात हाहाकार माजवलेला, परदेशातील रस्त्यावरच खोकत-खोकत स्वतःचा जीव गमावणाऱ्यांचे व्हिडिओ मिनिटा-मिनिटाला सोशल मीडियावरून शेअर होत होते, कोरोनाचा चांगलाच धसका सर्वांनी घेतलेला, बिनओळखीचा चेहरा दिसला की त्याला हाकलून लावले जात होते, साडेचार महिन्यांपूर्वी बिनखांबी गणेश मंदिर चौकात रात्री अशाच एका माय-लेकीला हाकलून लावले जात असल्याची घटना व्हाईट आर्मीच्या जवानांच्या निदर्शनास येताच त्यांनी हस्तक्षेप केला. संबंधित माय-लेकीला ‘सीपीआर’मध्ये दाखल केले.

त्यानंतर आजअखेर त्यांची येथील विविध संस्थांनी जबाबदारी घेतली. पण, मूळगावी परतण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. लॉकडाउननंतर कर्नाटक बससेवा सुरू झाली आणि डबडबलेल्या डोळ्यांनी कोल्हापूरकरांचे आभार मानतच त्यांनी निरोप घेतला. मूळच्या बंगळूरच्या फातिमा बानू आणि त्यांची मुलगी सिमरन यांनी जात-धर्म आणि सीमावादापलीकडची कोल्हापूरकरांची ही अनोखी माणुसकी अनुभवली.  फातिमा यांना अर्धांगवायू असल्याच्या स्पष्ट खुणा त्यांच्याकडे पाहताच 
दिसतात; तर सिमरन दहा वर्षांची. दोघीही कोल्हापुरात असतानाच लॉकडाउन जाहीर झाला आणि येथेच अडकल्या. भिकारी म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यातूनच जिथे असतील तिथून त्यांना हाकलले जायचे.

रात्रीच्या वेळेस त्यांच्यावर दगडफेक करीत असल्याची घटना लक्षात येताच व्हाईट आर्मीचे जवान राजू कुंभार, विनायक भाट यांनी संस्थापक अशोक रोकडे यांच्याशी संपर्क साधला आणि श्री. रोकडे यांनी राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांना ही माहिती देताच त्यांनीही सहकार्य केले. १०८ रुग्णवाहिकेतून या माय-लेकीला ‘सीपीआर’मध्ये दाखल केले गेले. दोघींचेही कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्यांना सायबर रोडवरील अल्पसंख्याक वसतिगृहात दाखल केले.

पण, काही दिवसांनी फातिमा यांनी बंगळूरला परत सोडण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांना सोडण्याची व्यवस्था झाली. पण, कोगनोळीपर्यंत गेल्यानंतर मात्र त्यांना कर्नाटकात प्रवेश दिला गेला नाही. मग, त्यांनी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. एकेक दिवस जात होता, तरीही काहीच मार्ग निघत नव्हता. पुन्हा त्यांना अल्पसंख्याक वसतिगृहात आणले. काही दिवसांनी मात्र त्यांना ‘वानप्रस्थ’ संस्थेने खऱ्या अर्थाने आधार दिला. येथे सुलोचना श्रीधर, इंद्रायणी मळगे त्यांच्या मैत्रिणीच बनल्या. पण, तरीही बंगळूरला परतण्याची फातिमा यांची मागणी कायम होती. अखेर महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा सुरू झाल्यावर त्यांना सुखरूप परत पाठविले. 

मायेच्या ओलाव्याची शिदोरी...
कोल्हापूरच्या परंपरेप्रमाणे फातिमा आणि सिमरन यांनी नवीन कपड्यांचा आहेर आणि कोल्हापूरकरांच्या मायेच्या ओलाव्याची शिदोरी घेऊनच सर्वांना निरोप दिला. हेल्पलाईन ग्रुपचे सचिन घाटगे, प्रशांत साठे, गणेश कांबळे, गणेश यादव, यास्मिन काझी आदींची या काळात मोलाची मदत झाल्याचे व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे सांगतात.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com